धुळवडीनंतर जुहू चौपाटीवर अभिनेत्रीशी अश्लील चाळे; दोघांना पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:06 IST2025-03-16T15:05:00+5:302025-03-16T15:06:22+5:30
याप्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.

धुळवडीनंतर जुहू चौपाटीवर अभिनेत्रीशी अश्लील चाळे; दोघांना पोलिसांकडून अटक
मुंबई : धूलिवंदनानंतर जुहू चौपाटीवर फिरताना एका टीव्ही अभिनेत्रीसोबत दोन मुलांनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्चला रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान ती आई-वडिलांसोबत रंग खेळून जुहू येथील नोवाटेल चौपाटीवर फिरत होती. त्याच वेळी दोन जणांनी पाठीमागून येऊन अश्लीलपणे स्पर्श करीत त्यांचा विनयभंग केला. तेव्हा चिडलेल्या पीडितेने त्यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी पीडितेला ‘तेरे को क्या, जो करने का हैं वो कर’ असे बोलून तेथून पळ काढला.
तत्काळ आरोपीचा शोध
पीडिता पोलिस चौकीत गेली. त्या ठिकाणी जुहू पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय धोत्रे व शिपाई संग्राम कांबळे हजर होते.
त्यानंतर धोत्रे आणि कांबळे यांनी पीडितेसोबत जुहू चौपाटीवर जाऊन तत्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यास आणले. आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
होळीच्या पार्टीत महिला कलाकाराचा विनयभंग
होळीच्या पार्टीत एका २९ वर्षीय महिला टीव्ही कलाकाराचा विनयभंग झाला. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी तक्ष नारायण (३०) या सहकलाकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार ही अंधेरी पश्चिमच्या लोटस बिजनेस पार्कमध्ये असलेल्या एका टीव्ही वाहिनीच्या कार्यालयात काम करते. तिच्या तक्रारीनुसार १४ मार्चला त्यांच्या कार्यालयाच्या टेरेसवर होळीनिमित्त कर्मचाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये तक्षदेखील उपस्थित होता. तेव्हा त्याने अतिप्रमाणात मद्याचे सेवन केले होते.
तक्षने दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान तक्रारदारासह अन्य महिलांना रंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारदार महिला कलाकाराने त्याला विरोध केला. तेव्हा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि बघतो तुला कोण वाचवतो, असे म्हणत त्याने तिचा टी-शर्ट खेचत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.