"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:01 IST2026-01-08T08:57:13+5:302026-01-08T09:01:40+5:30
MNS Sandeep Deshpande: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली आहे. राज ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे ...

"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
MNS Sandeep Deshpande: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली आहे. राज ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांच्याही पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेले संतोष धुरी यांनी संदीप देशपांडे यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. धुरी म्हणाले, "वांद्रे येथील बंगल्यावरून अशा सूचना होत्या की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही दिसता कामा नयेत. ज्यांच्यामुळे पक्ष फुटला त्यांनाच राज साहेबांनी जवळ केले, हे पाहून वाईट वाटले." धुरी यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांनी संदीप देशपांडेंना सोबत येण्याची गळ घातली होती, परंतु त्यावर देशपांडेंनी तू तुझा विचार कर, मी सध्या येत नाही, असे उत्तर दिले होते.
त्यानंतर संदीप देशपांडेही मनसेला जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजूनतरी माझ्यावर अशी वेळ आलेली नाही, असं म्हटलं. बंडखोरी आणि संतोष धुरी यांच्या प्रकरणावरुन पक्षातील वरिष्ठांसोबत चर्चा झाली का असा सवाल संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला. यावर संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सगळंच मला येतं या विचाराचा मी नसल्याचे त्यांनी म्हटलं.
"अशी माझ्याबरोबर तरी चर्चा झालेली नाही. जाहीरनामा, जागा वाटपाच्या कोणत्याही प्रक्रियेत मी नव्हतो. जेव्हा मला एखादी जबाबदारी देतात तेव्हा ही मलाच का दिली असं मी विचारत नाही किंवा मला एखादी जबाबदारी नाही दिली तर ती का नाही दिली हा विचारायचा माझ्याकडे अधिकार नाही. राज ठाकरेंना एखाद्या गोष्टीसाठी मी योग्य आहे वाटल्यास ते मलाच सांगतील. सगळंच मला येतं या विचाराचा मी नाही आणि असा फाजील आत्मविश्वास देखील नाही. ते मी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो हे वाटलं नाही त्यात काही चुकीचे नाही. त्यात राग येण्यासारखी गोष्ट नाही," असं संदीप देशपांडे म्हणाले.
"संतोष धुरी मला रोज भेटतात. त्यांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा की बरोबर हे ठरवण्याचा माझा अधिकार नाही. प्रत्येकाचा निर्णय हा त्याचा त्याचा असतो आणि तो चुकीचा की बरोबर हे मी सांगण्यापेक्षा येणारा काळ ठरवत असतो. उद्या मला वाटलं की माझ्या पक्षात अॅसेट नाही तर लायबिलिटी आहे तर मी स्वतःहून बाजूला होईल, मी लायबिलिटी झालो तरी मला पोसा असा अट्टहास असणार नाही.पक्षात मी अॅसेट म्हणून असेल तरच मी काम केलं पाहिजे. जर आपल्यामुळे पक्षाला अडचणी निर्माण होत आहेत असं वाटायला लागलं तर तु्म्ही लायबिलिटी ठरता. अजूनतरी माझ्यावर अशी वेळ आलेली नाही. ज्यावेळी येईल त्यावेळी मी निर्णय घेईन," असंही संदीप देशपांडे म्हणाले.