After Renu Sharma withdrew the complaint, Trupti Desai has criticized Minister Dhananjay Munde | "...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात"

"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात"

मुंबई: गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. 

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी मोठी हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  त्यानंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यास सुरुवात झाली. मात्र रेणू शर्मा आणि तिच्या वकिलावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना देखील धमक्या देणे, ट्रोल करणे, असे प्रकार झाले. या दबावाखाली रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी लागली, असा दावा तृप्ती देसाई यांनी फेसबुकद्वारे केला आहे. 

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री तसेच सरकारमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला. तुम्ही जर हिंमतीने पोलीस ठाण्यात गेलात, तर तुम्हाला न्याय मिळणार नाही, असा संदेश सध्या राज्यभर या प्रकरणातून जात आहे. तसेच यावरूनच नेमकी मानसिकता आपल्या राज्यात काय आहे, हे लक्षात दिसूय येते, असं तृप्ती देसाई यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात, असंही तृप्ती देसाई यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं आहे. 


आवाज कोणाचा? माज हा सत्तेचा,  महिलेवर दबाव आणून हाणून पाडला- राष्ट्रवादी पुन्हा.
बलात्काराच्या तक्रारीत, विवाहबाह्य...

Posted by Trupti Desai on Thursday, 21 January 2021

तत्पूर्वी, धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.  गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. 

खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर कारवाई करावी- चित्रा वाघ

रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. परंतु आता त्यांनी तो मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकंच धक्कादायक आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून भाजपची भूमिका होती ती स्पष्ट होती. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. आम्ही चुकीचं उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असंही चित्रा वाघ यांनी सांगितले. 

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणातात...

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Renu Sharma withdrew the complaint, Trupti Desai has criticized Minister Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.