रेल्वे दुर्घटनेचं वृत्त वाचून यातना झाल्या, शरद पवारांनी सरकारला काही सूचना केल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:43 PM2020-05-08T15:43:50+5:302020-05-08T15:45:00+5:30

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

After reading the news of the train accident, Sharad Pawar made some suggestions to the government MMG | रेल्वे दुर्घटनेचं वृत्त वाचून यातना झाल्या, शरद पवारांनी सरकारला काही सूचना केल्या

रेल्वे दुर्घटनेचं वृत्त वाचून यातना झाल्या, शरद पवारांनी सरकारला काही सूचना केल्या

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजूरांबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेमुळे मनाला यातना झाल्याचं पवार यांनी म्हटलंय. पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेबाबत शोक व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. स्थलांतरी मजूरांचा प्रश्न गंभीर असून तो सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असेही पवार यांनी म्हटलंय. 

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. जालना येथील स्टील कंपनीचे १९  कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुबीयांस ५ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. औरंगाबादमधील या घटनेनंतर खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. तसेच, कामगरांच्या स्थलांतरणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याचेही पवार म्हणाले. 

''औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही, तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं. राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी'', अशा सूचनाही पवार यांनी केल्या आहेत. 


जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.
 

Web Title: After reading the news of the train accident, Sharad Pawar made some suggestions to the government MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.