कुर्ल्यातील भीषण घटनेनंतर घाटकोपरमध्ये बस अपघात; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:21 IST2024-12-15T16:21:02+5:302024-12-15T16:21:39+5:30
कुर्ला बस अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झाला.

कुर्ल्यातील भीषण घटनेनंतर घाटकोपरमध्ये बस अपघात; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Ghatkopar Bus Accident: कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गोवंडी परिसरात एका २५ वर्षीय तरुणाचा बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झाला. घाटकोपर पूर्व येथील शिवाजी नगर जंक्शन बस स्टॉपजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने दुचाकीस्वाराचा अपघात झाला. ही बस शिवाजीनगरहून कुर्ला बसस्थानकाकडे जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
दीक्षित विनोद राजपूत असे मृताचे नाव आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री दुचाकीस्वार तरुण बसच्या उजव्या बाजूला मागील टायरला धडकला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी ३९ वर्षीय बसचालक विनोद आबाजी रणखांबे आणि बस कंडक्टर अविनाश विक्रमराव गीते यांना अटक करण्यात आली आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाला तात्काळ पोलीस व्हॅनमधून घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १२:१४ वाजता डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.
काही दिवसांपूर्वी कुर्ला पश्चिमेतील एसजी बर्वे मार्गावर बेस्ट बसने सात जणांना ठार केले आणि ४२ जण जखमी झाले होते. बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बसने पादचाऱ्यांना आणि अनेक वाहनांना धडक दिली होती. त्यानंतर बस एका इमारतीच्या गेटवर जाऊन धडकली होती. अपघातानंतर रक्ताने माखलेले मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसले. गोंधळाच्या वातावरणात आजूबाजूचे लोक जखमींना रुग्णालयात नेत होते. तपासानंतर बस चालकाला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा पुरेसा अनुभव नव्हता आणि केवळ तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर बस देण्यात आली होती अशी माहिती समोर आली होती.
अपघातानंतर बसमधील प्रवासी स्वतःला वाचवण्यासाठी खिडक्या तोडून बाहेर पडत होते. बसच्या आत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ड्रायव्हर बॅक घेऊन जाताना दिसत आहे. ब्रेक निकामी झाल्याने चालक संजय मोरे याचे बसवरील नियंत्रण सुटले, असे अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र, आरटीओ पथकाने तपासणी केली असता बसचे ब्रेक ठीक असल्याचे आढळून आले. मोरेला नंतर अटक करण्यात आली आणि त्याला इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याचा खुलासा झाल्यानंतर त्याच्यावर निर्दोष हत्येचा आरोप ठेवण्यात आला.