AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:12 IST2025-11-28T13:08:19+5:302025-11-28T13:12:45+5:30
Mumbai Local Fake Pass: अंबरनाथमधील इंजिनिअर पतीसह त्याच्या बँकेत काम करणाऱ्या पत्नीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी बनावट लोकल ट्रेनचा पास बनवला होता.

AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
Mumbai Crime News: एसी लोकलमधून प्रवास करत असलेल्या गुडिया शर्मा यांना टीसीने तिकीट विचारले. त्यांनी पास असल्याचे सांगितले. युटीएस अॅप सुरू होत नसल्याचे सांगत त्यांनी एका लिंकवर क्लिक केलं. क्रोम ब्राऊजरवर पास दिसला. पण, तो बघितल्यानंतर अशी गोष्ट दिसली, ज्यामुळे टीसीला संशय आला आणि तयार केलेल्या बोगस पासचे बिंग फुटले. या प्रकरणात अंबरनाथमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनीअटक केली.
ओमकार शर्मा (वय ३०), गुडिया शर्मा (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या अंबरनाथमधील पती-पत्नीचे नाव आहे. ओमकार शर्मा इंजिनिअर आहे, तर गुडिया शर्मा बँकेमध्ये सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.
यूटीएसऐवजी क्रोमवर दाखवले तिकीट
२६ नोव्हेंबर रोजी कल्याणवरून दादरला निघालेल्या एसी लोकलमधून गुडिया शर्मा प्रवास करत होत्या. कल्याण-डोंबिवली दरम्यान, टीसी विशाल नवले यांनी महिलेकडे तिकीट मागितले. त्यावेळी गुडिया शर्मा यांनी टीसीला सांगितले की, त्यांच्याकडे पास आहे. पण, रेल्वेच्या युटीएस मोबाईल अॅपवर पास ओपन होत नाहीये.
त्यानंतर गुडिया शर्मांनी लिंकवर क्लिक करून क्रोम ब्राऊजरवर ओपन झालेला पास दाखवला. टीसी नवले यांनी पास बघितला. त्यांनी क्यूआर कोड बघितला. क्यूआर कोड सक्रिय नसल्याने त्यांना शंका आली.
टीसीने हेल्पलाईनला कॉल केला आणि गुडिया शर्मा अडकली
टीसी नवले यांनी शंकास्पद वाटत असलेल्या पासची पडताळणी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या हेल्पलाईनवर कॉल केला. त्यांनी पासबद्दलची माहिती विचारली. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, हा पास फेब्रुवारी महिन्यातच संपलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पास गुडिया शर्मा नव्हे तर एका पुरूषाच्या नावाने दिला गेला होता. त्या व्यक्तीचे नाव ओमकार शर्मा आहे.
ओमकार शर्मा निघाला गुडिया शर्माचा पती
गुडिया शर्मा बोगस पासवर प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर टीसीने त्यांना ताब्यात घेतले आणि कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यात गुडिया शर्मा यांनी पास बनावट असल्याची कबुली दिली. ओमकार शर्मा पती असून, तो इंजिनिअर असेही सांगितले.
इंजिनिअर पतीने तयार केला पास
पोलिसांनी ओमकार शर्मालाही चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने सांगितले की, मला कोडिंगचा ज्ञान आहे. त्याचाच उपयोग करून आणि एआयच्या मदतीने मी बोगस युटीएस पास तयार केला होता.
कल्याण रेल्वे पोलिसांनी ओमकार शर्मा आणि गुडिया शर्मा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४० आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली.