abu azmi says we should pray to farmers as we same pray to cow | गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा : अबू आझमी

गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा : अबू आझमी

नव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरीमुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे नेते देखील उपस्थित आहेत. यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही शेतकरी मोर्चाला पाठिंबा देत कार्यक्रमाला हजेरी लावली. 

शेतकरी आंदोलकांकडून सुरू असलेल्या लढाईचं आणि त्यांनी दाखवलेल्या मनोधैर्याचं कौतुक यावेळी अबू आझमी यांनी केलं. "गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायलाच हवेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना संपविण्याचं काम करत आहे", असं अबू आझमी यावेळी म्हणाले. 

फोटो: "मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय", पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट

आझाद मैदानातील मोर्चाच्या ठिकाणी अनेक राजकीय नेते आणि शेतकरी नेते उपस्थित आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, तिस्ता सेटलवाड, अशोक ढवळे आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित आहेत. 

...म्हणून मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता धूसर

अबू आझमी यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलकांना मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी प्रोत्हासन केलं. "शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या जाचाला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी यानिमित्ताने पंजाब, हरियाणासह देशातील सर्वच शेतकऱ्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि माझ्या शेतकरी बांधवांनी आणखी तीव्रतनं सरकारला आपलं महत्व दाखवून द्यावं", असं अबू आझमी म्हणाले. 

राज्यपालांना देण्यात येणार निवेदन
शेतकरी मोर्चा आझाद मैदानानंतर राजभवनाकडे कूच करणार असल्याची माहिती किसान मोर्चाकडून देण्यात आली आहे. पण यासाठी पोलिसांनी परवानगी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना आझाद मैदानातच मोर्चा संपवावा लागेल, असं मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. तरीही राजभवनाकडे कूच करण्याच्या भूमिकेवर किसान मोर्चा ठाम आहे. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देऊ शकतं, पण राजभवनाकडे मोर्चा नेण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. 

राज्यपाल गोव्यात
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा शेतकऱ्यांच्या मानस आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागू शकते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या राजभवनात नाहीत. ते गोव्यात आहेत. कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे राज्यपालांकडून शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला संध्याकाळी पाचची वेळ दिली असल्याचं समजतं. त्यामुळे राज्यभरातून मुंबईत आलेले शेतकरी आज मुक्काम करण्याची शक्यता आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: abu azmi says we should pray to farmers as we same pray to cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.