मुंबईत भयंकर घडलं! किरकोळ वाद अन् मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या, पोटात खुपसले शस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 01:13 IST2026-01-25T01:11:35+5:302026-01-25T01:13:27+5:30
मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर किरकोळ वादातून एक भयंकर घटना घडली. ३३ वर्षीय प्राध्यापकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाला.

मुंबईत भयंकर घडलं! किरकोळ वाद अन् मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या, पोटात खुपसले शस्त्र
पश्चिम रेल्वेच्या मालाड रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना घडली. लोकलमधून उतरत असताना झालेल्या किरकोळ वादातून एका ३३ वर्षीय प्राध्यापकावर हल्ला करण्यात आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आलोक कुमार सिंग असे या प्राध्यापकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
कांदिवली येथे राहणारे आलोक कुमार सिंग हे विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
लोकलमध्ये नेमके काय घडले?
शनिवारी चर्चगेट-बोरिवली धीम्या लोकलमधून आलोक कुमार सिंग प्रवास करत होते. सिंग आणि आरोपी यांच्यात लोकलमधून प्रवास करताना वाद झाला. मालाड स्थानकात उतरल्यानंतर दोघांमध्ये टोकाचा वाद झाला.
याचवेळी हल्लेखोराने खिशातून धारदार शस्त्र काढले आणि आलोक कुमार सिंग यांच्या पोटात खुपसले. पोटाच्या उजव्या बाजूला वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले आणि फलाटावरच कोसळले.
त्यांना आजूबाजूच्या लोकांनी तातडीने उचलले आणि शताब्दी रुग्णालयात नेले. तिथे तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे.