'कामावर असताना करायचे शिवीगाळ'; बेपत्ता व्यक्तीची महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुला-मुलीने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:53 IST2025-03-17T16:45:26+5:302025-03-17T16:53:04+5:30
एक ७५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली होती. तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली.

'कामावर असताना करायचे शिवीगाळ'; बेपत्ता व्यक्तीची महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुला-मुलीने केली हत्या
-मंगेश कराळे, नालासोपारा
बेपत्ता असलेल्या एका ७५ वर्षीय व्यक्तीची एक महिन्यांपूर्वीच हत्या झाल्याचे नायगाव पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी एक मुलगी व एक मुलगा असे दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना चौकशी व तपासासाठी उत्तन पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बोरिवलीत राहणारे व फेरीचा व्यवसाय करणारे किशोर मिश्रा (७५) हे घटनेच्या दिवशी नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिवरी रोडवरील सनटेक बिल्डिंगच्या परिसरात आले होते. पण ते त्यानंतर बोरिवली येथील घरी पोहचले नाही.
शोध घेतला, पण सापडले नाही; मोबाईलही होता बंद
घरच्यांनी नातेवाईक यांच्याकडे त्याचा शोध घेतला, पण ते सापडले नाही. म्हणून त्यांच्या मुलाने १५ फेब्रुवारीला किशोर मिश्रा हे मिसिंग असल्याची तक्रार दिली होती. त्याचा तपास पोलीस हवालदार देविदास पाटील यांच्याकडे देण्यात आला. सदर मिसींग मिश्रा यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून नायगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन वेगवेगळे पथके बनवून शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तपासादरम्यान, मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आधारे मिश्रा हे एक मुलीसोबत भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात उतरुन बाहेर पडताना दिसले. त्यानंतर मिश्रा व संशयित मुलगी दिसून न आल्याने तांत्रिक विश्लेषन व माहितीच्या आधारे एक अल्पवयीन मुलगी व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली.
आरोपींनी डोक्यात मारली फरशी
किशोर मिश्रा हे अल्पवयीन मुलीला कामाचे ठिकाणी कायम शिवीगाळी करायचे. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन उत्तन येथील बालेशाह पीर दर्गाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्याजवळ दोन्ही अल्पवयीन आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड व फरशीची लादी टाकुन हत्या करुन त्यांचा मृतदेह बाजूला असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये फेकून दिला. उत्तन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रोशन देवरे व गणेश केकान, पोहवा देविदास पाटील, शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पाडुरंग महाले, अमोल बरडे यांनी या गुन्ह्याच्या तपासाचे काम केले.