9 85 fire incidents in Mumbai in six months | मुंबईत सहा महिन्यांत ९८५ आगीच्या घटना
मुंबईत सहा महिन्यांत ९८५ आगीच्या घटना

मुंबई : कमला मिल कंपाऊंडसारख्या आगीच्या घटनेने मुंबईसाठी धोक्याची घंटा वाजवली. उपाहारगृह व आस्थापनांची झाडाझडती सुरु झाली. आगीशी खेळणाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणी अग्नि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जातात. यामुळे गेल्या सहा महिन्यांत ९८५ ठिकाणी आग लागल्याचे दिसून आले. अशा दुर्घटनांमध्ये पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून १२३ लोकं जखमी झाले आहेत.

आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईत लागलेल्या आगीची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबई अग्निशमन दलाकडे या कालावधीत २९१७ दुर्घटनांची नोंद झाली आहे. यापैकी ९८५ ठिकाणी आग, घर पडण्याच्या ७० घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये एकूण २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये १ ते १५ तारखेपर्यंत सर्वाधिक १२५ ठिकाणी आग लागण्याची घटना घडल्या. 

आगीचा धोका कमी होण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून मुंबई अग्निशमन दलाने विभागस्तरावरच इमारतींच्या तपासणीसाठी ७२ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा उपाययोजना कायद्यांतर्गत इमारतीच्या मालकाने परवानाधारक एजन्सीमार्फत वर्षातून दोनवेळा आपल्या इमारतीमधील अग्नि सुरक्षा यंत्रणेची तपासणी करुन ती कार्यान्वित आहेत का? याची खातरजमा करणे आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल मुंबई अग्निशमन दलाकडे सादर करणे अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी या नियमाचा भंग केला जात असल्याचे समोर आले आहे.

यामुळे वाढतोय आगीचा धोका...
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त असते, वायरिंंग बंदिस्त नसते, चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते, इमारतीबाहेरील रस्त्यावर वेडीवाकडी पार्किंग, अग्नि सुरक्षेबाबत निष्काळजी यामुळे आगीचा धोका व जीवितहानी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
पालिकेने केलेल्या तपासणीत निम्म्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. जनजागृती, प्रशिक्षण आणि इमारतींची तपासणी, नोटीस व कारवाईच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यात येत आहे.

इमारतीमध्ये असावी ही सुरक्षा
अग्निरोधक यंत्र, स्मोक डिटेक्टर्स, पाण्याचे पंप, पाण्याचा शिडकाव (स्प्रिंकलर्स ) आपत्कालीन वीज व्यवस्था, आगीच्या दुर्घटनेत इमारतीबाहेर पडण्याचा आपत्कालीन मार्ग असणे आवश्यक आहे.

आगीची आकडेवारी
दहा वर्षांत - ४८ हजार ४३४
जीवितहानी - ६०९
वांद्रे ते अंधेरी - आठ हजार ३२८
गगनचुंबी इमारत - १५३८
रहिवाशी इमारत - ८७३७
व्यासायिक इमारत - ३८३३
झोपडपट्ट्यांमध्ये - ३१५१

आगीची कारणे...
शॉर्ट सर्किट - ३२ हजार ५१६
गॅस सिलिंडर लिकेज - एक हजार ११६


Web Title: 9 85 fire incidents in Mumbai in six months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.