होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 05:51 IST2026-02-27T05:48:59+5:302026-02-27T05:51:33+5:30
होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने होळीनिमित्त १९८ विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी ८३ बस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. यात ग्रुप बुकिंग, वैयक्तिक बुकिंगचा समावेश असून, सर्वाधिक बुकिंग २८ फेब्रुवारीचे असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्याच्या ओढीने प्रवाशांची संख्या शिगेला पोहोचते. यावर विशेष लक्ष केंद्रित करत २८ फेब्रुवारी, १ मार्चला तब्बल १५० फेऱ्या नियोजित केल्या आहेत.
त्यापैकी ७० बस फुल्ल झाल्या आहेत. याशिवाय इतर दिवसांसाठी १३ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
एकूण फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा संस्थात्मक प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
सणासुदीच्या कालावधीत खासगी बसचे तिकीट साधारण २,५०० ते ४ हजार रुपये असते. त्यात एसटीचे तिकीट अधिक परवडणारे ठरणार आहे.
यामुळे लालपरीला पसंती
व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. ग्रुप बुकिंग केल्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतून थेट गावी, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे लालपरीला लोकांची पसंती मिळताना दिसत आहे.