राज्यातील 799 पोलिसांना पोलीस महासंचालक पदक; गुणवत्तापूर्ण सेवा, उल्लेखनीय कामगिरीची दखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:20 AM2021-05-01T06:20:27+5:302021-05-01T06:25:14+5:30

गुणवत्तापूर्ण सेवा, उल्लेखनीय कामगिरीची दखल  

799 policemen in the state were awarded the Director General of Police Medal | राज्यातील 799 पोलिसांना पोलीस महासंचालक पदक; गुणवत्तापूर्ण सेवा, उल्लेखनीय कामगिरीची दखल  

राज्यातील 799 पोलिसांना पोलीस महासंचालक पदक; गुणवत्तापूर्ण सेवा, उल्लेखनीय कामगिरीची दखल  

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ७९९ अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदके शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात, पुणे शहर पोलीस दलातील सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १५ अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण व उत्तम सेवा, उल्लेखनीय आणि शौर्यपूर्ण कामगिरीसाठी हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

पुणे शहर पोलीस दलातील सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह सहआयुक्त (अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई) समाधान नेताजी पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक (मोटार परिवहन, महाराष्ट्र राज्य) मार्किन भोसले, पोलीस उपायुक्त (वाहतूक, नवी मुंबई) पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त (महानगर विकास प्राधिकरण) नीलेश अष्टेकर, पोलीस अधीक्षक (पुणे) स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त (पुणे) पूर्णिमा गायकवाड, अपर नियंत्रक (नागरी हक्क संरक्षण व गृहरक्षक, महाराष्ट्र राज्य) संजय जाधव, पोलीस उपायुक्त (औरंगाबाद शहर) निकेश खाटमोटे, अपर पोलीस अधीक्षक (वर्धा) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (ठाणे शहर) लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त (मध्य रेल्वे मुंबई) एम.एम. मकानदार, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट ४, नागपूर पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पुणे) प्रतिभा जोशी, पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश, पुणे) अरविंद आल्हाट यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

सेवेत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख, क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून दोषींविरुद्ध ठोस पुरावे जमा करणे, तसेच नैसर्गिक आपत्तीवेळी केलेली उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांसह २० वर्षे विनाअपघात उत्तम सेवाभिलेख, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखविणे, विशेष शाखेत उत्तम कामगिरी आणि प्रशंसनीय स्वरूपाचे अन्य व अत्युत्तम काम केल्याबद्दल अधिकारी आणि अंमलदारांनाही गौरविण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ७९९ अधिकारी, अंमलदारांचा यात सन्मान करण्यात येणार आहे.

१४ अंमलदारांना मिळणार शौर्यपदक

नक्षलग्रस्त गडचिरोली पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे आणि नागनाथ पाटील यांच्यासह आणि १४ अंमलदारांना शौर्यपूर्ण कामगिरीसाठी पोलीस शौर्य पदकाने गौरविण्यात येणार आहे, तसेच दरोडेखोर आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांविरोधात केलेल्या कारवाईसाठी नक्षलग्रस्त गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह राज्यातील २८ पोलीस अधिकारी आणि १०२ अंमलदारांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: 799 policemen in the state were awarded the Director General of Police Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.