मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ७४ टक्के पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 14:46 IST2023-07-31T14:46:01+5:302023-07-31T14:46:46+5:30
मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागवली जाते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ७४ टक्के पाणी!
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी जूनमध्ये तळ गाठला होता. त्यानंतर गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. मुंबईची तहान भागवणाऱ्या सात तलावांमध्ये ७३.९९ टक्के पाणी जमा झाले असून पालिका प्रशासनाकडून १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.
मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागवली जाते. या सात तलावांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. यातील तुळशी व विहार ही धरणे सोडली तर इतर धरणे मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहेत. या धरणांतून मोठ्या जलवाहिन्यांद्वारे हे पाणी मुंबईत आणले जाते. उन्हाळ्यात तर या तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे पालिकेने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. आता मात्र तुळशी, तानसा, विहार आणि मोडक सागर हे तलाव ओसंडून वाहत आहेत.
तलाव (शिल्लक पाणीसाठा)
अप्पर वैतरणा ४९.७९ %
मोडक सागर १०० %
तानसा ९९.१८ %
मध्य वैतरणा ८९.५१ %
भातसा ६६.३८ %
विहार १०० %
तुळसी १०० %