सीईटी परीक्षेसाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी बदलून घेतले परीक्षा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:46 PM2020-06-20T18:46:28+5:302020-06-20T18:46:57+5:30

परीक्षेची तयारी युद्धपातळीवर सूरु असल्याची आयुक्तांची माहिती

59,000 students change examination centers for CET exams | सीईटी परीक्षेसाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी बदलून घेतले परीक्षा केंद्र

सीईटी परीक्षेसाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी बदलून घेतले परीक्षा केंद्र

googlenewsNext

 

मुंबई : राज्यात एमएचटी सीईटीच्या परीक्षा जुलैमध्ये होणार असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना त्यांचे केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत तबला ५९ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्रात बदल करून घेतल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली. जुलै महिन्यात होणाऱ्या सीईटी सेलच्या परीक्षेची युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती ही त्यांनी दिली.  राज्यात ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी एमएचटी सीईटीची परीक्षा देणार आहेत.

राज्यातल्या अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. राज्यात एकूण ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची आधी नोंदणी झाली होती. मात्र नोंदणीच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आल्याने अतिरिक्त नोंदणी झाली आणि ती संख्या धरून ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. इतर स्पर्धा परीक्षाप्रमाणे पुणे आणि मुंबई येथे परीक्षांच्या कोचिंगसाठी आलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये आपापल्या मूळ गावी गेले आहेत. राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता त्यांना आपल्या मूळ गावाहून पुन्हा परीक्षांच्या ठिकाणी बोलावणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नसल्याने जिल्हा परीक्षा केंद्र बदलण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडूनच ही माहिती देण्यात आली होती.

जुलै ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० आणि ३१ या तारखांना परीक्षा घेण्यात येणार आहे. ३ ते ५ ऑगस्टला पुन्हा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेचे हॉलतिकिट किंवा प्रवेशपत्र देखील तयार असून लवकरच ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील असेही कदम यांनी सांगितले. लवकरच परीक्षेचे वेळापत्रक ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे पाऊल उचलले होते. जे घरी परतले त्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा खूपच फायदा झाला आहे. सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी म्हणजे एकूण परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ११ टक्के विद्यार्थ्यांनी केंद्र बदलून घेतले आहे. यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता अधिक जपता येणार आहे.
- संदीप कदम, आयुक्त , सीईटी सेल
 

Web Title: 59,000 students change examination centers for CET exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.