मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या 4 तरुणींना कारनं उडवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:45 IST2018-05-08T14:39:10+5:302018-05-08T14:45:41+5:30
पोलीस भरतीसाठी आलेल्या चार महिला उमेदवारांना भरधाव कारनं उडवल्याची घटना घडली आहे. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील ही घटना आहे.

मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या 4 तरुणींना कारनं उडवलं
मुंबई : पोलीस भरतीसाठी आलेल्या चार महिला उमेदवारांना भरधाव कारनं उडवल्याची घटना घडली आहे. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील ही घटना आहे. मंगळवारी (8 मे )सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी तरुणींना उपचारांसाठी पालिकेच्या महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून या पार्श्वभूमीवर मुंबईत धावण्याची चाचणी पूर्व द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर घेतली जात आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर विक्रोळी स्टेशनकडे जात असताना 4 तरुणींना टाटा झेन गाडीने उडवले. यात या चारही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी जखमी तरुणींची नावं आहेत. पुण्याच्या शिरुरमध्ये असलेल्या शिरोळे अकादमीच्या या सर्व तरुणी आहेत. यातील दीपाली काळेला जास्त दुखापत झाली आहे. दरम्यान, वाहन चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.