मुंबईकरांचे ३ लाख कोटी गेले कुठे?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 11:05 AM2023-03-26T11:05:07+5:302023-03-26T11:18:29+5:30

या प्रकरणाची निश्चित कालावधीत आवश्यक यंत्रणांमार्फत चौकशी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

3 lakh crore corruption in BMC, BJP MLA Ameet Satam allegation, CM Eknath Shinde ordered an inquiry | मुंबईकरांचे ३ लाख कोटी गेले कुठे?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबईकरांचे ३ लाख कोटी गेले कुठे?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

googlenewsNext

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असताना भाजपा आमदार अमित साटम यांनी मुंबईकरांचे पैसे गेले कुठे असा सवाल करत महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या आरोपीची एसीबी, ईडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी सभागृहात त्यांनी केली. त्यावर साटम यांनी मांडलेल्या आरोपांची एका कालमर्यादा कालावधीत चौकशी करण्यात येईल. त्यातील दोषींना सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित साटम यांनी महापालिकेच्या कारभारावर मुद्दे उपस्थित केले. गेल्या २५ वर्षात ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची निश्चित कालावधीत आवश्यक यंत्रणांमार्फत चौकशी करू. दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊद्या. आकसापोटी, सूड भावनेतून आपले सरकार काम करत नाही. परंतु जे चुकीचे असेल त्याला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी केलीच पाहिजे असं सांगत त्यांनी चौकशीचे आदेश दिले. 

काय होता अमित साटम यांचा आरोप?
अंतिम आठवडा प्रस्तावावर अमित साटम म्हणाले की, या देशात टूजी, फोरजी, चारा अगदी महाराष्ट्रात सिंचन घोटाळाही झाला परंतु या देशात सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेच्या कारभारात ३ लाख कोटींचा झाला. या घोटाळ्यात मुंबईकरांचे पैसे गेले कुठे? हा सवाल मुंबईकर विचारतायेत. हे पैसे कुठे गेलेत हा खुलासा या कागदपत्रातून होईल. जे मी आज सभागृहात मांडतोय असं त्यांनी सांगितले.

तसेच हमसफर डिलर प्रायव्हेट लिमिटेड. जी कोलकाता इथं रजिस्टर आहे. या कंपनीचे तत्कालीन संचालक नंदकिशोर चर्तुवेदी, माधव गोविंद पाटणकर, श्रीधर माधव पाटणकर हे होते. या कंपन्यांमधून ५० कोटींचे मनी लॉन्ड्रिंग केले गेले. कोलकात्यात रजिस्टर झालेल्या २७ कंपन्यांची नावे, त्यांचे पत्ते मी देतो. या कंपन्यांच्या माध्यमातून मुंबईकरांचा पैसा या कंपन्यांमध्ये गेला. हा कागदपत्रांचा सेट सभागृहाला देतो असं भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले. ऐका काय आरोप केलेत?

सुनील प्रभूंनी घेतला आक्षेप
ज्या कंपन्यांचा उल्लेख करतात, संचालकांची नावे घेतली गेली. मुंबई महापालिकेचा पैसा या कंपन्यांमध्ये गेला असं म्हणतायेत. त्याचे पुरावे आहेत का? कोर्टात सिद्ध झालंय का? असा आरोप होऊ शकत नाही. चुकीचे रेकॉर्डवर येऊ नये हा आक्षेप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी घेतला. 

दरम्यान, सुनील प्रभू यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आमदार अमित साटम यांनी प्रत्युत्तर देत मी दिलेले कागदपत्रे ACB, ईडी या तपास यंत्रणांना पाठवावे. मुंबई महापालिकेचा पैसा गेला की नाही गेला ते तपासात स्पष्ट होईल. इकडे तुम्हाला त्यावर भाष्य करायची आवश्यकता नाही आणि कर नाही तर डर कशाला असा टोला साटम यांनी ठाकरे गटाला लगावला. 
 

Web Title: 3 lakh crore corruption in BMC, BJP MLA Ameet Satam allegation, CM Eknath Shinde ordered an inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.