27 हजार मुंबईकरांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम तोडले़ ; पोलिसांनी गुन्हे नोंदवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:17 AM2021-02-03T03:17:23+5:302021-02-03T03:17:32+5:30

Coronavirus : कोरोना निर्मूलनासाठी  देशभर लॉकडाऊन लागू केल्यापासून सोमवारपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, नियम झुगारणाऱ्यांविरोधात मुंबईत २७ हजार ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

27,000 Mumbaikars break Corona ban Police reported the crime | 27 हजार मुंबईकरांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम तोडले़ ; पोलिसांनी गुन्हे नोंदवले

27 हजार मुंबईकरांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम तोडले़ ; पोलिसांनी गुन्हे नोंदवले

Next

मुंबई : कोरोना निर्मूलनासाठी  देशभर लॉकडाऊन लागू केल्यापासून सोमवारपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, नियम झुगारणाऱ्यांविरोधात मुंबईत २७ हजार ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात, आतापर्यंत २५ हजार ७८३ जणांवर  कारवाई करत जामिनावर सोडण्यात आले आहे. शासन निर्णयानंतर यातील किती गुन्हे रद्द होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 

मुंबईतही लॉकडाऊनसह विविध आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले केले गेले. त्यात जूनपासून अनलॉकचा टप्पा सुरू झाला. दोन आठवडे घरी राहण्याच्या म्हणजेच होम क्वारंटाइनच्या सूचना,  जमावबंदीचे आदेश धुडकावणाऱ्यांसह अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात सोमवारपर्यंत ५७ हजार २४५ जणांविरुद्ध २७ हजार ६७७ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 

यात, कोरोना रुग्ण संबंधित (३१३), हॉटेल आस्थापना (३१४), पानटपरी (१३४), इतर दुकाने (१५०८), सार्वजनिक ठिकाणी गर्दी (११,१६७), अवैध वाहतूक (३०८२), मास्क न वापरल्याबाबत (११,१७१), अन्य (६८९) गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.  

आधी सार्वजनिक ठिकाणी गर्दी.. आता विनामास्क वावर..
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. यात आतापर्यंत एकूण ११ हजार १७१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
त्यापाठोपाठ सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ११ हजार १६६ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे.
मुंबईत दाखल एकूण गुन्ह्यांत आतापर्यंत २५ हजार ७८३ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे, २२ हजार ५७५ जणांना नोटीस देत सोडण्यात आले आहे, तर ८८५७ जणांचा शोध सुरू आहे. 

गुन्हे कसे मागे घेतले जातात?
गुन्हे मागे घेण्याबाबत जीआर काढला जातो. पुढे त्यातील तरतुदीनुसार गुन्हे रद्द केले जातात, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश साळसिंगिकर यांनी दिली. यापूर्वी राजकीय, आंदोलनाच्या प्रकरणात जीआरमध्ये समिती नेमली जावी व तिच्याकडे अर्ज करावा असे होते. समितीमध्ये पोलीस आयुक्तसुद्धा होते, असेही त्यांनी नमूद केले. 

मुंबईतही लॉकडाऊनसह विविध आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले केले गेले. त्यात जूनपासून अनलॉकचा टप्पा सुरू झाला. 

निर्णय हाती आल्यानंतर पुढील भूमिका...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लॉकडाऊनच्या काळात दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे संकेत दिल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तसेच याबाबतचा शासन निर्णय मिळताच, पुढील भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
 

Web Title: 27,000 Mumbaikars break Corona ban Police reported the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.