२७ सेकंदांचे दुर्लक्ष...! नजर हटली, चार वर्षांची चिमुरडी बाराव्या मजल्यावरून कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:13 IST2025-07-26T12:12:39+5:302025-07-26T12:13:17+5:30
१२ व्या मजल्यावरून खिडकीतून पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नायगावमध्ये मंगळवारी घडली.

२७ सेकंदांचे दुर्लक्ष...! नजर हटली, चार वर्षांची चिमुरडी बाराव्या मजल्यावरून कोसळली
नालासोपारा : १२ व्या मजल्यावरून खिडकीतून पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नायगावमध्ये मंगळवारी घडली. अनविका प्रजापती (४) असे चिमुकलीचे नाव आहे. नवकार इमारतीच्या फेज एकमधील ए-३ विंगमध्ये हा प्रकार घडला. इमारतींच्या खिडक्यांना सुरक्षा जाळ्या नसल्याने हा प्रकार घडला. या घटनेचे वृत्त गुरुवारी प्रसिध्द झाले होते, मात्र शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यावर घटनेचा तपशील समोर आला.
तिला बॉक्सवर बसविले
घरातून चिमुरडी आणि एक महिला बाहेर पडतात. महिला तिला चप्पल घालून देण्यासाठी खिडकीजवळच्या चप्पल स्टॅंडच्या लाकडी बॉक्सवर बसवून ठेवते.
ती स्वत: खिडकीत बसली
महिला आधी तिची चप्पल घालते. त्या काही सेकंदाच्या वेळेत चिमुरडी चप्पल बॉक्सवरून उठून स्वत:च सुरक्षा जाळ्या नसलेल्या खिडकीत बसते.
सुरक्षा जाळ्या असत्या तर...
महिला मुलीस चप्पल घालून देण्यासाठी उभी होत नाहीत तोच तोल जाऊन चिमुरडी कोसळते. हा घटनाक्रम अवघ्या २७ सेकंदात घडला.