मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 05:29 IST2025-10-21T05:25:31+5:302025-10-21T05:29:02+5:30
तीन दिवसांत तब्बल २५ आगीच्या घटनांनी शहर हादरले.

मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तीन दिवसांत तब्बल २५ आगीच्या घटनांनी शहर हादरले. सोमवारी पहाटे कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, शिवशक्तीनगर मच्छीमारनगर येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीररीत्या भाजले. आग लागल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. वाहनाच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती समोर आली असून, तातडीने फायर ब्रिगेड, पालिका कर्मचारी, पोलिस दल तसेच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. ३५ मिनिटांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली, मात्र घरातील सर्व सामान जळून खाक झाले.
कफ परेड येथील आगीच्या घटनेत यश विठ्ठल खोत (१५) या युवकाचा मृत्यू झाला असून, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. देवेंद्र चौधरी (३०) गंभीर भाजले असून, त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर विराज खोत (१३) आणि संग्राम कुर्णे (२५) या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
रविवारी रात्री ही वरळीतील महाकालीनगर येथे आग लागल्याची आणखी एक घटना घडली. अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत ही आग विझवली. या आगीत सुदैवाने कोणतीही जखमी अथवा जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास ही आग लागली. घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे १ सहायक मुख्य अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी, १ अधिकारी, ५ फायर इंजिन, ४ जंबो टँकर, आणि १०८ रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुमारे १ हजार चौरसफूट क्षेत्रातील इमारतीत विद्युत तारा, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, घरगुती साहित्य, लाकडी फर्निचर, टीव्ही आणि देव्हारा यांना आग लागल्याने वित्तहानी झाल्याची माहिती आहे.
काेट्यवधींची मालमत्ता खाक
ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या तापमानासोबतच शहरात आगीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. दिवाळीनिमित्त उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे आणि शॉर्टसर्किटमुळे गेल्या तीन दिवसांत मुंबईतील विविध भागांमध्ये २५ आगीच्या घटना घडल्या. यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची माहती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. आगीच्या वाढत्या घटनांमुळे रात्रंदिवस अग्निशमन दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ उडत आहे. नागरिकांनी फटाके, दिवे व विद्युत उपकरणे वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.