१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 07:22 IST2025-04-11T07:21:46+5:302025-04-11T07:22:09+5:30
मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.

१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील १ लाख ६ हजार ६८० शाळांनी ‘शाळा मूल्यांकन’ प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, १,८५० शाळांनी ही प्रक्रिया अद्याप सुरूच केली नसल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) १० एप्रिलच्या अहवालामधून समोर आली आहे. १० एप्रिल हा मूल्यांकन प्रक्रियेसाठीचा शेवटचा दिवस होता. मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.
राज्यात सर्वांत खालच्या क्रमांकावर मुंबई उपनगर जिल्हा आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात २५० शाळांनी, तर मुंबई शहर जिल्ह्यात २१ शाळांनी अद्याप ही प्रक्रिया सुरू केलेली नाही. तिसरा क्रमांक धाराशिव जिल्ह्याचा आहे.
पुरेसा वेळ मिळत नाही
स्क्वाफबाबतचा आदेश दोन महिन्यांपूर्वी काढला होता. त्यावेळी शिक्षक हे प्रशिक्षणात व बोर्डाच्या परीक्षांचे पेपर तपासणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे वर्षभराच्या कामांच्या नोंदी आणि फोटो अपलोड करणे याला वेळ पुरेसा मिळतच नाही, असे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळ महासंघाचे माजी कार्याध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी सांगितले.
पाच जिल्ह्यांची आघाडी
शाळा मूल्यांकन प्रक्रियेमध्ये लातूर, चंद्रपूर, सातारा, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील एकूण शाळांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे. १२ जिल्ह्यांनी बरी कामगिरी केली आहे.