मुंबईमध्ये अकरावीच्या चौथ्या फेरीत १८ हजार प्रवेश; ‘विज्ञान’, ‘कला’पेक्षा वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:53 IST2025-07-31T11:53:31+5:302025-07-31T11:53:31+5:30
विज्ञान व कला शाखांमध्ये तुलनेने खूपच कमी प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

मुंबईमध्ये अकरावीच्या चौथ्या फेरीत १८ हजार प्रवेश; ‘विज्ञान’, ‘कला’पेक्षा वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावी प्रवेशाच्या केंद्रीकृत चौथ्या फेरीत मुंबई जिल्ह्यातील एकूण ८२ हजार ८०० जागांपैकी केवळ १८ हजार ४७४ जागा विद्यार्थ्यांना वितरित (अलॉटमेंट) केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेत झाले असून, विज्ञान व कला शाखांमध्ये तुलनेने खूपच कमी प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
कला शाखेत आठ हजार एकशे एकाेणसाठ (८,१५९) जागा उपलब्ध होत्या, परंतु केवळ एक हजार दोनशे तीन (१,२०३) विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या, तर वाणिज्य शाखेत एकूण ४९,२७५ जागांपैकी १२,१०२ जागा भरल्या आहेत. तसेच विज्ञान शाखेतील २५,३६६ जागांपैकी ५,१६९ जागा विद्यार्थ्यांना मिळाल्या. ही प्रवेशाची यादी ३१ जुलै रोजी जाहीर होणार होती. मात्र, शिक्षण विभागाकडून एक दिवस आधीच जाहीर केली गेली.
राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश दिले आहेत. त्यानुसार विज्ञान शाखेत ४२,२२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, तर कला शाखेत १,५६९ विद्यार्थ्यांना जागा मिळाली आहे. वाणिज्य शाखेत २,६५३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
आतापर्यंत राज्यभरात ८३,९८४ विद्यार्थ्यांना प्रवेश
तीनही प्रमुख शाखांमध्ये मिळून राज्यभरातील एकूण ८३,९८४ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अर्ज करणे अपेक्षित आहे. प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असून, उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळेल, असे शिक्षण विभागाने सांगितले.
मुंबईत बोर्डनिहाय जागा (अलॉटमेंट )वाटप या प्रमाणे
एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना १६,३८२
सीबीएसई ५८२
आयसीएसई १,०१०
आयबी २
आयजीसीएसई १३२
एनआयओएस ८०
इतर बोर्डातून २८६