भाजपाचे 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात, जयंत पाटलांचा 'दे धक्का'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:08 IST2020-03-04T14:54:22+5:302020-03-04T15:08:39+5:30
भाजपचे 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात आहेत, त्यांची कामं आम्हाला करावी लागतात.

भाजपाचे 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात, जयंत पाटलांचा 'दे धक्का'
मुंबई - जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला धक्का देणारं विधान केलं आहे. भाजपा नेते आणि माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत, चक्क 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र, पक्ष फोडण्याचे राजकारण आम्हांला जमत नाही. सरकार टिकवणे याकडे आमचे जास्तीत जास्त लक्ष आहे, असेही पाटील म्हणाले.
भाजपचे 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात आहेत, त्यांची कामं आम्हाला करावी लागतात. कारण, ते आमचे जुनेच सहकारी आहेत, असे म्हणत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्तेसाठी भाजप हापापलेला आहे. सत्तेत कधी जाऊन बसतो याची स्वप्न भाजप पाहत आहे. त्यासाठीच, सरकार पडणार किंवा आमदार फुटणार अशा वावड्या उठवल्या जातात, असेही ते म्हणाले.
मागील ५ वर्ष वित्त मंत्री असताना @SMungantiwar यांनी महाराष्ट्रातील जनतेला फक्त स्वप्नेच दिली. आता विरोधी पक्षात असतानाही आपलंच सरकार येणार या स्वप्नात ते आहेत. त्यामुळे 'मुंगेरीलाल के सपने' प्रमाणेच 'मुनगंटीवार के सपने' सुद्धा सर्वज्ञात आहेत. तसे पुस्तकही आम्ही प्रसिद्ध करु. pic.twitter.com/9cJI9U5CgK
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 4, 2020
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे. माजी वित्तमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांनी त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात काहीही कामं केली नाहीत. त्यांनी जनतेला केवळ स्वप्नच दिली, आताही आपलं सरकार येणार या स्वप्नात ते असतात. त्यामुळे, आम्ही 'मुंगेरीलाल के सपने' यासारखे 'मुनगंटीवार के सपने' नावाने पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.