११५ वर्षे जुनी मुरूडची गाडी धावणार बडोद्याच्या रस्त्यावर; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज कार रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:43 PM2023-01-04T13:43:07+5:302023-01-04T13:43:32+5:30

बडोदा संस्थानचे महाराज समरजीत सिंह गायकवाड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज गाड्यांच्या एका आलिशान रॅलीचे आयोजन केले आहे.

115-year-old Murud train to run on Baroda roads; Vintage Car Rally on the occasion of Amrit Mahotsav of Independence | ११५ वर्षे जुनी मुरूडची गाडी धावणार बडोद्याच्या रस्त्यावर; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज कार रॅली

११५ वर्षे जुनी मुरूडची गाडी धावणार बडोद्याच्या रस्त्यावर; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज कार रॅली

googlenewsNext

मुंबई : नजरेला आकृष्ट करणारी उंची, डोळ्यात न भरणारी लांबी, तिला नुसते पाहिले तरी आरामदायी प्रवासाबाबत मनाला आश्वस्त करणारी अन् रस्त्यावरून धावताना सर्वांनाच आपल्याकडे वळून वळून पाहायला लावणारी... देशातील सर्वांत जुनी (विन्टेज) कार अशी ओळख असलेली ‘वूल्सली’ ही कार बडोद्यात होणाऱ्या ९० किलोमीटरच्या विन्टेल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. 

बडोदा संस्थानचे महाराज समरजीत सिंह गायकवाड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज गाड्यांच्या एका आलिशान रॅलीचे आयोजन केले आहे. त्याकरिता मुंबईतून वूल्सली गाडी तिथे चालली आहे. ‘२१ गन सॅल्यूट क्लासिक मोटरिंग टूर’, या नावाने बडोद्यातील राजे गायकवाड यांच्या लक्ष्मी विलास पॅसेल ते स्टॅच्यू ऑफ युनिटी या ९० किलोमीटर अंतरावर ही रॅली होणार आहे. या रॅलीसाठी देशभरातून २०० विन्टेज गाड्या सहभागी होणार असून यासाठी मुंबईतून २० विन्टेज गाड्या रवाना होत आहे. २०० गाड्यांच्या रॅलीमध्ये १९०८ सालची वूल्सली ही सर्वांत जुनी गाडी वाहनप्रेमींना आकर्षित करणार आहे. 

 या स्पर्धेसाठी मूळ आंध्र प्रदेशमधील गोंडोला संस्थानच्या मालकीची आणि आता उद्योगपती अब्बास जसदानवाला यांच्या मालकीची असलेली १९२३ ची लॅन्चेस्टर ही गाडीदेखील रवाना होत आहे, तर वाहनप्रेमी नितीन डोसा यांच्यादेखील चार गाड्या या रॅलीची शान वाढविणार आहेत. एल्व्हीस (१९३३), अन्साल्डो (१९२१), डॉज (१९२१ आणि १९३०) या चार गाड्या ते पाठविणार असल्याचे नितीन डोसा यांनी सांगितले. यापैकी अन्साल्डो या चारच गाड्या आता जगात शिल्लक असून त्यापैकी एक डोसा यांच्या मालकीची आहे.

 १९०८ सालची वूल्सली या गाडीचे विद्यमान मालक उद्योगपती अब्बास जसदानवाला हे आहेत. या गाडीचे मूळ मालक रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिराचे राजे सिद्धी हे आहेत. जसदानवाला यांनी या राजघराण्याकडून थेट ही गाडी विकत घेतली आहे. आजही अतिशय उत्तम अवस्थेत असलेल्या या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला ४ सिलिंडर इंजिन आहेत. ४ गीअर आणि तब्बल ३०६९ सीसीचे इंजिन आहे, अशी माहिती जसदानवाला यांचे मॅनेजर जयप्रकाश यांनी दिली. पुढे ड्रायव्हर आणि एक तर मागे आलिशान सोफा असून तिथेदेखील दोन जणांसाठी आसन व्यवस्था आहे.

...अन् लाल रंगाच्या गाडीचे उत्पादन थांबवले
बडोदा संस्थानच्या महाराणी शांतादेवी यांनी १९४८ साली ‘बेन्टली मार्क ६’ या भरजरी लाल रंगाच्या गाडीची खरेदी केली. मात्र, खरेदी करताना त्यांची एकच अट होती की, माझ्या खरेदीनंतर यापुढे या मॉडेलमध्ये एकही लाल रंगाची गाडी कंपनीने विकायची नाही. त्यानंतर कंपनीनेही त्यांच्या अटीचा सन्मान राखला, अशी चर्चा वाहनप्रेमींच्या वर्तुळात आहे.

Web Title: 115-year-old Murud train to run on Baroda roads; Vintage Car Rally on the occasion of Amrit Mahotsav of Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.