Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १५ जूनपर्यंत पाण्याची चिंता नाही!; धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:31 IST

जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी पर्वरी येथील मंत्रालयात माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, येत्या १५ जूनपर्यंत राज्याच्या गरजा भागतील इतका साठा शिल्लक असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी पर्वरी येथील मंत्रालयात दिली.

पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री शिरोडकर म्हणाले की, सध्याच्या उपलब्ध साठ्यामुळे पुढील १५ ते २० दिवस पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. मान्सून लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व धरणांची नियमित पाहणी, तपासणी आणि पाणीसाठ्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही भागात पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती व बागायती क्षेत्रासाठीही ही स्थिती दिलासादायक असल्याचे नमूद करताना मंत्री शिरोडकर म्हणाले की, उपलब्ध साठ्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातही पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.

राज्यातील जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी शासनाने दीर्घकालीन नियोजनावर भर दिला आहे. धरणांमधील साठ्याचा काटेकोर आढावा, पाण्याचा नियंत्रित वापर, तसेच लहान-मोठ्या बंधाऱ्यांच्या उभारणीद्वारे जलसंधारण वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. यामुळे केवळ उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळणेच नव्हे, तर शेती, बागायती आणि ग्रामीण भागासाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचा उद्देश साध्य होत आहे.

८० बंधारे पूर्ण

राज्यातील जलसंधारण क्षमता वाढविण्यासाठी १०० बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे ८० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. या बंधाऱ्यांमुळे जलसाठा वाढविणे, भूजलपातळी सुधारणा करणे आणि शेती तसेच स्थानिक भागांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: No water worries until June 15; dams have sufficient stock.

Web Summary : Maharashtra has sufficient water stock in dams until June 15. Water Resources Minister assures no water scarcity, with measures in place and dams regularly monitored. Eighty of 100 planned dams are complete, boosting water conservation.
टॅग्स :गोवापाणीपाणी टंचाईपाणी कपातजलवाहतूकधरण