Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान करणं भोवलं; भाजपाच्या विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 13:38 IST

“मासे खाल्लावर ऐश्वर्यासारखे डोळे होणार”, ‘त्या’ विधानाबद्दल विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस

भाजपा नेते आणि मंत्री विजयकुमार गावित यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल एक विधान केलं होतं. “नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले”, असं विजयकुमार गावित म्हणाले होते. धुळ्यातील सभेत बोलताना विजयकुमार गावितांनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या या विधानामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. अभिनेत्रीबद्दल असं विधान करणं विजयकुमार गावितांना महागात पडलं आहे. आता याप्रकरणी राज्याच्या महिला आयोगाकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या विधानाप्रकरणी विजयकुमार गावितांना नोटीस पाठवून तीन दिवसांत याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. रुपाली चाकणकरांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना मंत्री विजयकुमार गावित यांनी महिलांचा अवमान होईल असे वक्तव्य केले. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा, वर्तनाचा दीर्घ परिणाम समाजमनावर होत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने श्री. गावित यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगास तीन दिवसांत खुलासा सादर करावा,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

"मासे खाल्ल्यावर डोळे ऐश्वर्यासारखे होतात", मंत्रीमहोदयाचं अजब विधान

"ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी"; माशावरील विधानावर मंत्री गावितांचं स्पष्टीकरण

विजयकुमार गावित नेमकं काय म्हणाले?

धुळ्यातील सभेत मासे खाण्याचे फायदे सांगताना गावित यांनी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांचे उदाहरण दिलं होतं. तसेच मासे खाल्याने त्वचा चिकनी होत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रायबद्दल? ती बेंगलोरच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असं ते म्हणाले होते.

ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या या विधानानंतर विजयकुमार गावित यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. “ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मासे खाण्याचे, म्हणजेच फिश ऑईलचे आरोग्यासाठीचे फायदे मी आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले आहेत, हेच सांगण्याचाय यामागचा उद्देश होता,'' असं गावित यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनविजय गावीतभाजपारुपाली चाकणकर