संजय नार्वेकर अभिनेता
पूर्वी गणेशोत्सवात स्पर्धा व्हायच्या. या स्पर्धा कलावंत घडवण्याचे काम करायच्या. आता त्या कमी झाल्या आहेत. खरं म्हणजे स्पर्धा होणे आवश्यक आहे. कारण त्यातूनच लहान मुलांच्या तसेच तरुणांच्या कलागुणांना वाव मिळतो. कारण स्पर्धा असली की, शर्यत येते. ही स्पर्धा जिंकण्याची ईर्षा निर्माण करते. ही ईर्षा चांगली असते. मग जिंकण्याची, लढण्याची भावना निर्माण होते. मात्र, आता हेच कुठेतरी कमी होत चालले आहे. याची मात्र राहून राहून मला खंत वाटते.
आताच्या काळामध्ये गणेशोत्सवात कलावंत तयार होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी कलावंत घडवणे बंद झाले, असे मला नाही वाटत. कारण आता किती तरी नवीन कलावंत आपण बघतच आहोत. फक्त त्याचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी आंतर कॉलेजेसच्या ज्या एकांकिका स्पर्धा व्हायच्या त्यात आम्ही भाग घ्यायचो. हे झाल्यानंतर मग नाटकात यायचो. त्यानंतर आम्ही सिनेमामध्ये जायचो. आता नवीन कलाकार एकदम मालिकांमध्ये येतात. मालिकांचाही पॅटर्न बदलला आहे. याअगोदर मालिकांचे शूटिंग मुंबईमध्ये व्हायचे. आता मुंबईमध्ये मालिकांचे शूटिंग करणे महाग झाले आहे. त्यामुळे या मालिकांचे शूटिंग सातारा, कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागांमध्ये करण्यात येते. मग तिथल्याच स्थानिक कलाकारांची ऑडिशन घेतली जाते. त्यातूनच स्थानिक कलाकार मालिकांमध्ये घेतात. त्या त्या मालिकांमध्ये हे कलाकार चमकतातही. त्यामुळे हा एक प्रकारे पॅटर्नच झाला आहे.
काय झालेय की, आता मनोरंजनाचा पॅटर्न बदललाय. मनोरंजनाची साधनेही बदलली आहेत. पूर्वी मनाेरंजन म्हणजे स्टेजवर जी कला आपण सादर करायचो त्याला मनोरंजन म्हटले जायचे. मात्र, आता डान्स आले आहेत, रिॲलिटी शो आले, तसेच डिजिटल शो आले आहेत. आता आपण मोबाइलवरही स्क्रीनिंग करू शकतो. या सर्वांमुळे मनोरंजनाच्या साधनांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे स्पर्धा मागे पडत चालल्या आहेत. आमच्या वेळी उन्मेश, आयएनटी यांसारख्या एकांकिका स्पर्धा व्हायच्या. दुसरा एक असाही पॅटर्न झाला आहे की, पूर्वी नुसती ‘एनएसडी’ होती. पण आता मुंबई विभागानेही नाट्य विभाग सुरू केला आहे. पुण्यामध्ये ललित कला या संस्थेचा नाट्य विभाग आहे. या ठिकाणांहून नवीन कलाकार येतात. तेथे त्यांना रीतसर याचे शिक्षण मिळते. त्यामुळे पॅटर्न बदललाय, पण कलाकार येतच आहेत. पण गणेशोत्सवातील स्पर्धा सुरू राहायला पाहिजेत. ते वैभव कुठेतरी लोप पावत असल्याचे दु:ख आहे.