२००५ साली रिलीज झालेला 'नवरा माझा नवसाचा' (Navra Maza Navsacha Movie) हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. अजूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटातील गाणी हिट झालीच पण सिनेमातील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. 'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील सर्वच भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केलं. या चित्रपटात सर्वांच्या लाडक्या लक्ष्याची(Laxmikant Berde)ही वर्णी लागली होती. पण, सिनेमात मात्र ते दिसले नाहीत. या मागचं कारण नुकतेच सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी कलाविश्वातील मैत्रीचं त्रिकुट. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. सचिन पिळगावकर यांच्या बऱ्याच चित्रपटात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे असायचे. त्यांची जोडी हिट होती हे सगळ्यांनाच माहितीये. नवरा माझा नवसाचा चित्रपटातही ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती. या चित्रपटात लालू-प्रसाद या ड्रायव्हर-कंडक्टरच्या जोडीने धमाल आणली. लालू कंडक्टरच्या भूमिकेत अशोक सराफ आहेत. तर ड्रायव्हर प्रसादची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे साकारणार होते. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हा चित्रपट नाकारला. त्यामागचं कारण समोर आलं आहे.
"मी लक्ष्मीकांतला खूप मिस करतो..."
सचिन पिळगावकर म्हणाले की, "मी लक्ष्मीकांतला खूप मिस करतो. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. तो २००४ मध्येच मी बनवला होता. जानेवारी २००५ साली तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात मला लक्ष्याला घ्यायचं होतं. पण त्याच्या तब्येतीमुळे मी नाही घेऊ शकलो. त्याने स्वत:च मला सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. लक्ष्या म्हणाला होता, "तू म्हणतोयस, त्याचा मला आनंद आहे. पण मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाही." त्यामुळे तो त्या चित्रपटात काम करु शकला नाही. दुर्दैवानं डिसेंबर २००४ मध्ये तो आपल्याला सोडून गेला. फक्त मीच नाही तर प्रेक्षक आणि संपूर्ण सिनेइंडस्ट्री त्याला मिस करते. पण माझं त्याला मिस करणं हे फक्त इंडस्ट्रीला मर्यादित ठेवून नाही. माझ्या खासगी जीवनातसुद्धा मी त्याला मिस करतो"