दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन आज ५ वर्ष पूर्ण होत आहेत. १४ जून २०२० रोजी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्यने सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. तर बॉलिवूडही हादरलं होतं. पवित्र रिश्ता मालिकेपासून सुरुवात केलेल्या सुशांतने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं होतं. त्याच्या अभिनयातील करिअरमध्ये त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.
पवित्र रिश्ता मालिकेत सुशांतसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होता. मालिकेतील मानव-अर्चनाची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ते लिव्ह इनमध्येही राहत होते. आणि लग्नही करणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. अंकितासोबतच्या नात्याबाबत सुशांतने अनेकदा उघडपणे भाष्यही केलं होतं. अशाच एका मुलाखतीत बोलताना त्याने अंकितासोबत तीन वेळा लग्न केल्याचं म्हटलं होतं.
सुशांत म्हणाला होता की "पवित्र रिश्ताच्या सेटवर मी अंकितासोबत ३ वेळा लग्न केलं आहे. त्यामुळे आता खऱ्या आयुष्यात लग्न म्हणजे आमच्यासाठी एक विधी आहे. मला वाटत नाही की आम्हाला लग्न करण्याची गरज आहे. मला तर कोर्ट मॅरेजही चालेल. पण, अंकिताला ग्रँड वेडिंग हवं आहे. त्यामुळेच आमचं लग्न पुढे ढकलत आहे". मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत आणि अंकिता २०१६ मध्ये लग्न करणार होते.