मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ' (Dagadi Chaal) हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय.
‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.
'दगडी चाळ' मध्ये 'डॅडीं'चा विश्वासू सूर्या 'दगडी चाळ २'मध्ये अचानक तिरस्कार करू लागला आहे, याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच नुकतेच या चित्रपटातील 'राघू पिंजऱ्यात आला' हे एक जबरदस्त गाणे रिलीज झाले आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.