संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची गाजलेली वेबसीरिज 'हीरामंडी : द डायमंड बाजार'(Heeramandi Web Series)मधील सर्व कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. यात ताहा शाह बदुश्शा ( Taha Shah Badushsha)ने या वेबसीरिजमध्ये 'ताजदार बल्लोच'ची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं. देशप्रेम, प्रेम आणि आदर्श यांच्यात गुंतलेला हा नवाब ताहा शाह यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला.
हीरामंडी वेबसीरिजला प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ताहा शाह बदुश्शाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचा एक दुर्मीळ फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. “संजय सर, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, ताजदारची भूमिका दिल्याबद्दल आणि माझं आयुष्य शब्दात न सांगता येईल इतकं बदलून टाकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही केवळ दिग्दर्शक नाही, तर स्वप्नं पूर्ण करणारे आहात. तुमचा माझ्यावरचा विश्वास मी आयुष्यभर जपेन. आणि 'हीरामंडी'च्या संपूर्ण टीमला देखील या अद्भुत प्रवासासाठी धन्यवाद,” असं त्याने लिहिलं.
ताहा शाह बदुश्शाने साकारलेला 'ताजदार बल्लोच' एक स्वातंत्र्यप्रेमी, प्रेम आणि देशभक्तीमधील संघर्ष करणारा नवाब प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याच्या अभिनयातील भावना, रॉयल चारित्र्य आणि तगडा स्क्रीन प्रेझेन्स यामुळे हा पात्र 'हीरामंडी'च्या अफाट कलाकारांमध्ये सुद्धा उठून दिसला. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या सिनेमांमध्ये नेहमीच अशा जबरदस्त व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत, आणि ताहा यांची ही भूमिका देखील तितकीच गाजली. ताहा शाह बदुश्शा आता ‘पारो — द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राईड स्लेवरी’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणाऱ्या चित्रपटात एका वेगळ्या आणि धाडसी भूमिकेत दिसणार आहे.