Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १८ वर्षांनंतर स्वानंद किरकिरेंनी केलं सुधीर मिश्रांसोबत काम, 'समर ऑफ ७७' सीरिज बद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:29 IST

सुधीर मिश्रा आणि स्वानंद किरकिरे या जोडीने 'बावरा मन' आणि 'खोया खोया चांद' या गाण्यांसाठी शेवटचे एकत्र काम केलं होतं. आता 'समर ऑफ ७७'च्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र काम करणार आहेत. 

‘बँडवाले’ या शोच्या यशानंतर लेखक, गीतकार, अभिनेते आणि संगीतकार म्हणून ओळखले जाणारे स्वानंद किरकिरे आता दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी 'समर ऑफ ७७' या राजकीय ड्रामा सीरिजमधून संगीतकार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. सुधीर मिश्रा आणि स्वानंद किरकिरे या जोडीने 'बावरा मन' आणि 'खोया खोया चांद' या गाण्यांसाठी शेवटचे एकत्र काम केलं होतं. आता 'समर ऑफ ७७'च्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र काम करणार आहेत. 

१९७५-७७ दरम्यान भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'समर ऑफ ७७' ही आठ भागांची हिंदी वेब सीरिज आहे. या सीरिजमधून तरुणाईची बंडखोरी, आदर्शवाद आणि त्या काळातील भावनिक व सामाजिक संघर्ष यावर प्रकाश टाकला आहे. या वेब सीरिजमध्ये राहुल भट्ट, ईशा तलवार, विशाल वशिष्ठ, सौरभ शुक्ला, रजत कपूर, मानव विज, टीजे भानू आणि अंजन दत्त हे कलाकार झळकणार आहेत. 

या वेब सीरिजसाठी स्वानंद किरकिरे यांनी संगीत अल्बम तयार केला आहे. या अल्बममध्ये एकूण सहा गाणी असून त्यापैकी तीन गाणी त्यांनी स्वतः गायली आहेत. त्यातील “ये कैसा हे जुनून” हे गाणं विशेष लक्षवेधी ठरणार असून त्या काळातील भावनिक आणि राजकीय तीव्रता व्यक्त करेल अशी अपेक्षा आहे. या अनुभवाबद्दल बोलताना स्वानंद किरकिरे म्हणाले, “बँडवाले नंतर मी पुन्हा एकदा संगीताला कथानकाचा भाग म्हणून वापरण्याची संधी शोधत होतो, आणि 'समर ऑफ ७७'मध्ये ती संधी मला मिळाली. ही फक्त एक वेब सीरिज नाही, तर आपल्या इतिहासातील अत्यंत भावनिक काळाची कहाणी आहे. त्या काळात संगीत, कविता आणि अभिव्यक्ती यांनी विरोध आणि ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.”

ते पुढे म्हणाले, “आणीबाणीच्या काळावर आधारित कथा असल्यामुळे संगीत तयार करताना एक वेगळी जबाबदारी होती. फक्त गाणं तयार केलं नाही तर त्याद्वारे पिढीचा आवाज, त्यांची स्वप्ने आणि बदलाची इच्छा हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता. गाणी त्या काळाशी जोडलेली असली पाहिजेत, पण आजच्या प्रेक्षकांनाही भिडतील अशी असणे गरजेचं होतं. हा समतोल साधणे आव्हानात्मक आणि  तितकेच समाधानकारकही होतं”. 

स्वानंद पुढे म्हणाले, “मी या मालिकेसाठी सहा गाणी तयार केली असून त्यापैकी तीन गाणी स्वतः गायली आहेत. ‘ये कैसा हे जुनून’ हे गाणे माझ्यासाठी खास आहे. त्या काळातील तरुणाईची ऊर्जा, संभ्रम आणि बंडखोरी या गाण्यातून व्यक्त होते. हे गाणं म्हणजे त्या काळातील मोठ्या भावनिक अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करणे नेहमीच समृद्ध करणारे असते, कारण ते कथाकथनात प्रामाणिकपणा आणि खोली आणतात. ‘हजारो ख्वाइशे ऐसी’ आणि ‘खोया खोया चांद’नंतर त्यांच्यासोबत काम करण्याची माझी ही पाचवी वेळ आहे. ते संगीताला कथेत योग्य जागा देतात, जे खूप दुर्मिळ आहे. जेव्हा दिग्दर्शक संगीतावर विश्वास ठेवतो, तेव्हा संगीतकार म्हणून आपणही अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो”. 

शक्तिशाली कथानक, दमदार अभिनय आणि प्रभावी संगीतामुळे 'समर ऑफ ७७' ही मालिका ओटीटी विश्वात एक महत्त्वाची भर ठरणार आहे. स्वानंद किरकिरे यांचे संगीत या मालिकेला भावनिक खोली देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

टॅग्स :स्वानंद किरकिरेवेबसीरिज