Join us  

'लेकाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी पुन्हा तो...' शेखर सुमन यांच्या पत्नीसोबत घडलेला असा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 1:50 PM

शेखर सुमन म्हणाले, "माझ्या १० वर्षांच्या मुलाला आयुषला गमावलं. त्यानंतर मी पूर्णपणे उद्धवस्त झालो होतो.."

अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा स्क्रीनवर दिसणार आहेत. संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमध्ये त्यांची भूमिका आहे. सीरिजच्या प्रमोशननिमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतंच एक मुलाखतीत त्यांनी आयुष्यातला सर्वात दु:खद प्रसंग सांगितला. त्यांनी आपल्या १० वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. हृदयाचा आजार असल्याने त्याचे प्राण गेले होते.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, "मी माझ्या १० वर्षांच्या मुलाला आयुषला गमावलं. त्यानंतर मी पूर्णपणे उद्धवस्त झालो होतो. मला जगावंसंही वाटत नव्हतं. माझ्या काळजाता तुकडाच माझ्यापासून हिरावला गेला होता.  मी अक्षरश: जमिनीवर डोकं आपटून रडलो होतो. जगण्याची इच्छाच संपली होती."

ते पुढे म्हणाले, "माझ्यात जीवच उरला नव्हता. काम करण्याची, पैसे कमावण्याचीही इच्छा नव्हती. फिल्म इंडस्ट्रीत यश अपयशाचीही मला काळजी नव्हती. दिखाव्याच्या जगात मी नुसतंच हसायचो किंवा आर्थिक गरज म्हणून काम करायचो कारण घर चालवायचं होतं."

...अन् मुलगा परत समोर दिसला

शेखर सुमन म्हणाले, "मुलाच्या निधनानंतर मी अनेक पंडितांना जाऊन भेटलो आणि विचारलं की असं का होतंय? तेव्हा ते म्हणाले की तुमचा मुलगा तुम्हाला एकदा नक्की भेटेल. २००९ साली बिहारमध्ये मी प्रचार रॅलीत सहभागी झालो होतो आणि माझी पत्नी काशी विश्वनाथला गेली होती. मध्येच मला तिचा फोन आला आणि तिने अशी धक्कादायक गोष्ट सांगितली ज्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. तिची एका सेकंदासाठी आयुषशी भेट झाल्याचं ती म्हणाली. ती जेव्हा कारमध्ये बसली तेव्हा एक मुलगा आला आणि तिला पैसे मागायला लागला. तिने मुलाकडे पाहिलं तेव्हा तो आयुषसारखाच दिसला. तिने त्याला पैसे दिले तर तो म्हणाला,'यात माझं काय होणार?' हे वाक्य आयुष आजारी असताना बोलायचा. त्याचं वाक्य ऐकताच ती बेशुद्ध झाली जेव्हा तिला शुद्धा आली तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हतं."

टॅग्स :शेखर सुमनबॉलिवूडवेबसीरिजपरिवार