Join us  

प्रतिक्षा संपली! कधी रिलीज होणार 'पंचायत 3'? नीना गुप्तांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 1:51 PM

ग्रामीण भागातील कथा विनोदी पद्धतीने दाखवणारी ही सिरीज सगळ्यांनाच आवडली.

ओटीटीवरील सिरीजची क्रेझ सध्या वाढतच चालली आहे. घरबसल्या वेगवेगळा कंटेंट पाहता येत असल्याने प्रेक्षकही खूश आहेत. अनेक लोकप्रिय सिरीजमधून एकाचं नाव घ्यायचं तर 'पंचायत' (Panchayat). ग्रामीण भागातील कथा विनोदी पद्धतीने दाखवणारी ही सिरीज सगळ्यांनाच आवडली. सिरीजचे २ भागही आले तर आता तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा तिसरा भाग कधी येणार याचा खुलासा अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी केलाय.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नीना गुप्तांना 'पंचायत 3' बाबत काय अपडेट असं विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या,'ऑक्टोबर महिन्यात पंचायत 3 चं लास्ट शेड्यूल आहे. मग पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात सिरीज रिलीज होईल. सव्वा महिन्याची शूटिंग बाकी आहे जी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. पोस्ट प्रोडक्शनसाठी जवळपास पाच महिने तर लागतातच. त्यामुळे २०२४ च्या मार्च-एप्रिल महिन्यात तिसरा सिझन येईल.'

२०२० मध्ये 'पंचायत'चा पहिला सिझन आला होता. प्रेक्षकांना हा सिझन खूपच आवडला.  तर याचा दुसरा सिझन २०२२ मध्ये रिलीज झाला. दुसऱ्या सिझनचा शेवट खूपच भावनिक झाला. फुलेरा गावाचा सचिव अभिषेक त्रिपाठी आणि सरपंच राजकारण्याशी पंगा घेतात. तेव्हा अभिषेकच्या बदलीची ऑर्डर येते. इथेच दुसरा सिझन संपतो. आता पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली आहे. यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पंचायतमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सानविका, रघुवीर यादव, चंदन रॉय, फैझल मलिक, पंकज झा यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रत्येकाचंच काम मनाला भिडणारं आहे. या सिरीजमुळे सर्वच कलाकार स्टार झालेत. 

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूडवेबसीरिज