Join us

लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 10:03 IST

जितेंद्र कुमार सुरुवातीला 'पंचायत' सीरिजमध्ये काम करण्यासाठी तयार नव्हता.

'पंचायत' ही ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय सीरिज. नुकताच सीरिजच्या चौथ्या सीझनचा टीझर रिलीज झाला. नव्या सीझनमध्ये 'फुलेरा' गावात निवडणूक असून प्रधानची आणि भूषण म्हणजेच बनराकस आमने सामने असणार आहेत. जुलै मध्ये सीझन भेटीला येत आहे. प्रेक्षक तर चौथ्या सीझनच्या रिलीजसाठी खूप आतुर आहेत. अभिनेता जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) 'सचिवजी'च्या भूमिकेतून सर्वांना प्रेमातच पाडलं. मात्र जितेंद्रने 'पंचायत' जेव्हा ऑफर झाली होती तेव्हा सुरुवातीला सीरिजला नकार दिला होता असा नुकताच खुलासा केला.

जितेंद्र कुमार सुरुवातीला 'पंचायत' सीरिजमध्ये काम करण्यासाठी तयार नव्हता. हा शो अमेरिकेतील लोकप्रिय 'द ऑफिस' शोसारखा असेल असं त्याला वाटलं होतं. सचिवजीची भूमिका आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे त्याला कळत नव्हतं. तो म्हणाला, "मी या शोचा भाग होईन अशी मी कधीच अपेक्षाही केली नव्हती. कारण आधी तर पंचायतची गोष्ट केवळ पंचायत ऑफिसच्या अवती भवती होती. मला वाटलं अमेरिकेन शो  'द ऑफिस'सारखंच हे आहे. मात्र नंतर मेकर्सने जेव्हा रिसर्च केला आणि गावाचा दौरा केला तेव्हा त्यांना वाटलं की गोष्ट फक्त पंचायत ऑफिसपुरती मर्यादित नसली पाहिजे. तर ही संपूर्ण गावाची कहाणी असली पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला."

तो पुढे म्हणाला, "पंचायत सचिवच्या म्हणजेच अभिषेक त्रिपाठीच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. मग इथून माझा प्रवास सुरु झाला. शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसात मी खूप नर्व्हस होतो. आपल्याला पाहिजे तसा अभिनय करता येतोय की नाही याची मला शंका होती. तसंच अशी हलकी फुलकी भूमिका मी पहिल्यांदाच साकारणार होतो. मात्र तेव्हा टीव्हीएफ च्या टीमने काही सीन पाहिले तेव्हा त्यांनी मला विश्वास दिला की मी चांगलं करत आहे आणि योग्य मार्गावर आहे. लेखक चंदन गुप्ताचं फक्त ऐकत राहा सगळं चांगलं सुरु आहे. मग मला बरं वाटलं आणि मी शूट एन्जॉय केलं."

टॅग्स :वेबसीरिजहिंदी