'क्रिमिनल जस्टीस' वेबसीरिजचे तीनही सीझन चांगलेच गाजले. पंकज त्रिपाठी यांनी माधव मिश्रा या वकीलाची भूमिका साकारली. तिनही सीझनमध्ये पंकज त्रिपाठींच्या अभिनयाने या वेबसीरिजला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. काहीच दिवसांपूर्वी 'क्रिमिनल जस्टीस' वेबसीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा झाली होती. आता सर्वांची उत्सुकता संपली आहे. कारण 'क्रिमिनल जस्टीस ४' चा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर पाहून यावेळी वेबसीरिजमध्ये फॅमिली ड्रामा बघायला मिळणार, हे दिसतंय.
'क्रिमिनल जस्टीस ४'चा टीझर
'क्रिमिनल जस्टीस ४'च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवली आहे. या टीझरच्या सुरुवातीला घराची बेल वाजते आणि माधव मिश्रा (पंकज त्रिपाठी) दरवाजा उघडतात. त्यांच्यासमोर सुरवीन चावला उभी असलेली दिसते. "मला वकील पाहिजे", असं म्हणत ती माधव मिश्रांना तिची केस लढण्यासाठी विनंती करताना दिसते. त्यानंतर पोलीस श्वानपथकासोबत एका घटनेचा तपास करताना दिसतात. साधारण १ मिनिटांच्या या टीझरमध्ये दिसतं की, 'क्रिमिनल जस्टीस ४'मध्ये यावेळी फॅमिली ड्रामा बघायला मिळणार आहे.
कधी रिलीज होणार 'क्रिमिनल जस्टीस ४'?
'क्रिमिनल जस्टीस ४'मध्ये पुन्हा एकदा वकील माधव मिश्राच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी झळकणार आहेत. 'क्रिमिनल जस्टीस ४'मध्ये पंकज त्रिपाठी यांच्यासोबत सुरवीन चावला, मोहम्मद झिशान अयुब, मीता वसिष्ठ, श्वेता बसू प्रसाद, कल्याणी मुळे हे कलाकार झळकणार आहे. २२ मे रोजी 'क्रिमिनल जस्टीस ४' वेबसीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे. जिओ+ हॉटस्टारवर ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.