मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून अज्ञाताने चाकू हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने हा व्यक्ती घरात घुसल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत होता परंतु सैफची पत्नी करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबातून वेगळेच प्रकरण बाहेर आले. या प्रकरणी पोलिसांनी ४०-५० लोकांची चौकशी केली असून करिना कपूरचाही जबाब नोंदवला आहे. करिनाने सैफवरील हल्ल्याच्या रात्री काय काय घडलं त्याची डिटेल्स पोलिसांना दिली.
पोलीस सूत्रांनुसार करिनानं तिच्या जबाबात सांगितले की, आरोपी जेव्हा घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता. घरात त्याने कुठलेही सामान चोरी केले नाही. ज्यावेळी सैफसोबत त्याची झटापट सुरू होती तेव्हा आरोपी आक्रमकपणे हल्ला करत होता परंतु कुटुंबातील लोक कसेबसे घराच्या १२ व्या मजल्यावर गेले. घरात ज्वेलरी समोरच ठेवली होती परंतु हल्लेखोराने त्याला हातही लावला नाही असं करिनाने पोलिसांना सांगितले. त्याशिवाय या घटनेने करिना इतकी घाबरली होती ज्यामुळे तिची बहीण करिश्माने तिला स्वत:च्या घरी नेले.
करिना कपूरने जबाबात काय सांगितले?
घरातील मुले, महिलांना वाचवण्यासाठी सैफने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला.
आरोपी आमचा लहान मुलगा जहांगीरवर हल्ला करायला आला होता असं वाटत होते. कारण हल्लेखोर त्याच्या खोलीत होता
महिलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, सैफनेही त्याला रोखले त्यामुळे तो जहांगीरपर्यंत पोहचू शकला नाही.
या झटापटीत आरोपीने सैफवर अनेकदा चाकूने वार केले.
जेव्हा आरोपी सैफवर हल्ला करत होता तेव्हा संधी मिळताच मी लहान मुले आणि महिलांना १२ व्या मजल्यावर पाठवले.
हल्लेखोराने घरातील कुठलीही वस्तू चोरली नाही, घरातील कपाटात ज्वेलरी तशीच होती.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवली असून एका संशयिताला ताब्यातही घेतले आहे. या व्यक्तीने मुंबईच्या पूर्व उपनगरात ११ डिसेंबरला अशाचप्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांनी त्याला पकडले परंतु मानसिक रोगी समजून त्याला पोलिसांच्या हवाली केले नाही. पोलीस सध्या या संशयिताच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड तपासत आहे. हा व्यक्ती पकडल्यानंतर स्वत:ला डिलिवरी बॉय असल्याचं सांगत होता.