'इंडियन आयडॉल' (Indian Idol) च्या पंधराव्या पर्वाचा नुकताच शेवट झाला. पश्चिम बंगालची मानसी घोष या सीझनची विजेती ठरली. बादशाह, विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल परीक्षकाच्या खुर्चीवर होते. विशाल ददलानी (Vishal Dadlani) गेल्या ६ सीझनपासून या शोचं परीक्षण करत आहे. मात्र आता त्याने इंडियन आयडॉलला निरोप द्यायचं ठरवलं आहे. सेटवरचा शेवटचा व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती दिली. हा आपला शेवटचा सीझन होता असं त्याने म्हटलं आहे.
विशाल ददलानीने इंडियन आयडॉल सेटवरुन व्हिडिओ शेअर करत लिहिले, "अलविदा यारो, ६ सीझनमध्ये जितकी धमाल केली त्यापेक्षा जास्त आता ती आठवणार आहे. मित्रांनो इथेच थांबतो, सलग सहा सीझननंतर आज इंडियन आयडॉलच्या परीक्षकाच्या रुपात माझा शेवटचा दिवस आहे. मला आशा आहे मला जितकी या शोची आठवण येईल तितकाच हा शोही मला मिस करेल."
तो पुढे लिहितो,"श्रेया, बादशाह आणि शोच्या सर्व टीमचे आभार. सर्व सह-परीक्षक, गायक आणि संगीतकारांचेही आभार. तुम्ही खरोखरंच माझे कुटुंबच होतात. या स्टेजवर माझं खूप प्रेम आहे. आता पुन्हा संगीत कंपोज करायची, कॉन्सर्ट्स करायची आणि जवळपास कधीच मेकअप न करण्याची वेळ आली आहे. जय हो!"
विशाल ददलानी आता पुन्हा संगीत दिग्दर्शनात व्यस्त होणार आहे. त्याच्या या पोस्टवर अदा खान, आदित्य नारायण, बादशाह यांनी कमेंट केली आहे. प्रेक्षकही पुढील सीझनमध्ये विशालला मिस करणार आहेत. तसंच यानंतर विशालच्या जागेवर कोण परीक्षक येतो याची सर्वांना उत्सुकता आहे.