Join us  

अमिताभ, धर्मेंद्र यांच्यापेक्षा होता मोठा सुपर स्टार, ३३ हिट्सनंतर अचानक बनला संन्यासी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 1:34 PM

भारतीय सिनेसृष्टीत राजेश खन्ना आणि दीलिप कुमार हे पहिले सुपरस्टार असल्याचे बोलले जाते, परंतु...

भारतीय सिनेसृष्टीत राजेश खन्ना आणि दीलिप कुमार हे पहिले सुपरस्टार असल्याचे बोलले जाते, परंतु अमिताभ बच्चन यांनी आपला दबदबा निर्माण केला आणि ७० व ८० चे दशक गाजवले. अँग्री यंग मॅन अशी ओळख त्यांनी निर्माण केली. पण, याच काळात अमिताभ यांना टक्कर देणारा एक नट होता आणि भारतीय चाहते त्याला अमिताभ व धर्मेंद्र यांच्यापेक्षा मोठा सुपरस्टार समजत होते. मात्र, कारकीर्दिच्या उच्च शिखरावर असताना या नायकाने संन्यास घेतला....

आपण विनोद खन्ना यांच्याबद्दल बोलत आहोत... फाळणीपूर्व भारतात १९४६ मध्ये जन्मलेले विनोद खन्ना मुंबईला स्थलांतरीत झाले. त्यांनी १९६८ मध्ये सुनील दत्तच्या 'मन का मीत' या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला, परंतु १९७१ च्या 'मेरा गाव मेरा देश'ने त्यांना स्टारडम मिळवून दिले. या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केली असली तरी, अनेक समीक्षक आणि प्रेक्षकांना असे वाटले की त्यांनी नायक धर्मेंद्रपेक्षा भारी छाप पाडली. यानंतर त्यांचे नायक म्हणून मेरे अपने, अचानक आणि इम्तिहान सारखे यशस्वी चित्रपट आले. त्यांना अमिताभ बच्चन आणि जितेंद्र यांसारख्या त्यांच्या समकालीन कलाकारांपेक्षा अधिक स्टार मानले जात होते.   

विनोद खन्ना हे एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून ओळखले जात होते आणि ते ओशोंचे शिष्य होते. १९८२  मध्ये ते ३६ वर्षांच्या असताना आणि कारकीर्दिच्या शिखरावर असताना त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेऊन सिने जगताला धक्का दिला. ते ओशो रजनीश यांच्या ओरेगॉन येथील नवीन आश्रमात गेले आणि पुढील चार वर्षे ते संन्यासी म्हणून राहिले. १९८६ मध्ये विनोद खन्ना भारतात परतले आणि त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली. पण, ७०च्या दशकातील स्टारडम ते पुन्हा मिळवू शकले ना ही. त्यांनी कुर्बानी, दयावान, चांदनी आणि जुर्म सारखे हिट चित्रपट दिले, परंतु ९०च्या दशकात अनेक फ्लॉप चित्रपटही त्यांनी दिले. १९९९ मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्यानंतर त्यांनी दीवानापन, वॉन्टेड आणि दबंग चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. २०१५ मध्ये आलेला शाहरुख खानचा हिट दिलवाले हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.

२०१७ मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. २७ एप्रिलला त्यांचे निधन झाले. त्यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. 

टॅग्स :विनोद खन्नाअमिताभ बच्चनधमेंद्रबॉलिवूड