असे अनेक कलाकार आहेत जे बॉलिवूड गाजवल्यानंतर थेट हॉलिवूडमध्ये झळकले. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन या कलाकारांनंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची हॉलिवूडमध्ये वर्णी लागली आहे. हा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. विद्युतने थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याच्या हाती आता मोठा प्रोजेक्ट लागला आहे.
लेजेंड्री एंटरटेनमेंटच्या 'स्ट्रीट फायटर' या अॅक्शन सिनेमात विद्युत जामवाल दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमात तो धालसिम ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी दुनियाशी लढत असल्याचं हे कॅरेक्टर आहे. या सिनेमातून विद्युत जामवाल हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
'स्ट्रीट फायटर' या सिनेमाची कथा अद्याप समोर आलेली नाही. पण, एका मार्शल आर्ट्स टुर्नामेंटवर आधारित सिनेमाची कथा असल्याचं सांगितलं जात आहे. अँड्र्यू कोडी, नोआ सेंटीनो, कैलिना लियांग, डेविड दास्तमालतियन, कोडी रोड्स, जेसन मोमोआ, कर्टिस जैक्सन, ओरविल पेर, एंड्रयू शुल्ज, रोमन रेन्स अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे.