Join us

महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात 'टॅक्स फ्री' झाला 'छावा', मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:20 IST

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देशभरात सध्या विकी कौशल  (Vicky Kaushal) याची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा (Chhaava Movie) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास त्यामुळे संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आले आहे. देशभरात नवनवीन विक्रम हा चित्रपट करत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हा चित्रपट 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे. पण, अशातच महाराष्ट्रात नाही तर एका दुसऱ्या राज्यात हा चित्रपट टॅक्स मुक्त करण्यात आला आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अखेर विकी कौशलचा 'छावा' चित्रपट करमुक्त (Chhaava Tax-free In Madhya Pradesh ) केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही बातमी जाहीर केली आणि मराठा शासकाबद्दल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले. यानंतर त्यांनी त्याच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे पूत्र संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' या हिंदी चित्रपटाच्या करमाफीची घोषणा करतो".

दरम्यान, सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात, तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु".

 

 'छावा' चित्रपटाद्वारे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली. तसेच, चित्रपटात अक्षय खन्ना देखील आहे. अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.काही मराठी कलाकारांनीदेखील चांगला अभिनय केलाय.  चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून गेलं. 'छावा'ची क्रेझ इतकी आहे की, थिएटर्सनी २४ तास शो सुरू केलेत आणि सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल सुरू आहेत. 

टॅग्स :विकी कौशलमध्य प्रदेश