Join us  

'द काश्मीर फाईल्स' वर आशा पारेख यांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कमाईतील किती पैसे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 9:48 AM

आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीचा सर्वात चर्चेतला सिनेमा म्हणजे 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files). विवेक अग्निहोत्रींच्या या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काश्मिरी पंडितांवर झालेला हल्ला, नंतर त्यांचं पलायन या सर्व घटनांवर हा सिनेमा आधारित होता. काश्मिरी पंडितांची कशा रितीने क्रूर हत्या केली गेली हे सिनेमात दाखवण्यात आलं. नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी 'द काश्मीर फाईल्स'वर तिखट टिप्पणी केली.

'द काश्मीर फाईल्स' आणि 'द केरळ स्टोरी' या दोन सिनेमांवर झालेल्या वादावर आशा पारेख यांना त्यांचं मत विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या,"लोकांनी सिनेमा पाहिला. पण मी यावर थोडी वादग्रस्त टिप्पणी करेन. सिनेमाच्या निर्मात्यांनी ४०० कोटी रुपये कमावले. मग काश्मिरी हिंदू जे जम्मूमध्ये वीज, पाणी या सोयीसुविधांशिवाय राहत आहेत त्यांना निर्मात्यांनी किती पैसे दिले?"

सिनेमाची संपूर्ण कमाई ही काही फक्त निर्मात्यांना मिळत नाही असं जेव्हा बोललं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या, "फिल्म डिस्ट्रिब्युटरचा एक शेअर असेल. प्रोड्युसरचा एक असेल. समजा ४०० कोटीपैकी त्यांना २०० कोटी जरी मिळाले असतील तरी त्यातले किमान ५० कोटी तरी ते काश्मिरी हिंदूंना देऊ शकत होते."

आशा पारेख यांच्या या वक्तव्यानंतर आता विवेक अग्निहोत्रींकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाला बॉक्सऑफिसवर फारसं यश मिळालेलं नाही.

टॅग्स :आशा पारेखविवेक रंजन अग्निहोत्रीद काश्मीर फाइल्सबॉलिवूड