बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या 'बेबी जॉन' या सिनेमामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०२४च्या २५ डिसेंबरला वरुण धवनने 'बेबी जॉन' प्रदर्शित करत चाहत्यांना खास गिफ्ट दिलं. तर २०२५ ची सुरुवातही त्याने एका खास गोष्टीने केली आहे. वरुण धवनने नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.
वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलालने मुंबईतील जुहू येथे २०२५ च्या सुरुवातीलाच नवीन घर खरेदी केलं आहे. 'D’Decor Twenty'मधील हा फ्लॅट सुमारे ५ हजार स्क्वेफूट परिसरात पसरला आहे. मुंबईतील प्राइम लोकेशनमध्ये असलेल्या या फ्लॅटसाठी वरुण धवनने २.६७ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तर या घराची किंमत तब्बल ४४.५२ कोटी इतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ३ जानेवारीला ही प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केली आहे.
दरम्यान, वरुण धवनने २०२१ मध्ये बालपणीची मैत्रीण नताशा दलाल हित्याशी लग्न करत संसार थाटला. गेल्या वर्षीच वरुण धवन बाबा झाला. जून महिन्यात नताशाने गोंडस लेकीला जन्म दिला. लारा असं त्यांनी मुलीचं नाव ठेवलं आहे. बेबी जॉननंतर वरुण धवन 'बॉर्डर २'मध्ये दिसणार आहेत.