'कौन बनेगा करोडपती १६'ची (KBC 16) सध्या चांगलीच चर्चा आहे. KBC 16 मध्ये प्रमोशननिमित्ताने अनेक कलाकार सहभागी होत असतात. अशातच KBC 16 मध्ये अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या आगामी 'वनवास' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने सहभागी होणार आहेत. या विशेष भागात नाना पाटेकरांसोबतच 'वनवास' सिनेमातील कलाकार उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. यावेळी नाना यांनी बिग बींविषयीच्या खास आठवणी सर्वांना सांगितल्या.
नाना पाटकेरांनी सांगितला खास किस्सा
नाना पाटेकर KBC 16 मध्ये आल्यावर त्यांच्यासमोर होस्ट अमिताभ बच्चन हॉटसीटवर बसले आहेत. यानिमित्त अनेक वर्षांनी नाना आणि अमिताभ एकत्र दिसणार आहेत. KBC 16 मध्ये काही वेधक किस्से आणि आठवणी सांगून तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. याच भागात नाना म्हणाले की, “आम्ही ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमितजी आले आणि सगळ्यांना मिठाई देऊ लागले. मी त्यांना विचारले की काय बातमी आहे? त्यावर ते म्हणाले, “माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो!” त्यावर नानांनी टिप्पणी केली, “किती वर्ष झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे.”
'कोहराम'च्या सेटवरचा किस्सा काय होता?
यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक गोड आठवण शेअर केली. ते म्हणाले, “एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना तसे सांगितले तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.”
या शुक्रवारी KBC 16 चा हा विशेष भाग सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघता येईल. नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरचा उद्देश आहे.