Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:56 IST

झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातं आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ३ ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील राणादा उर्फ हार्दिक जोशी, पाठक बाई उर्फ अक्षया देवधर, गोदाक्का उर्फ छाया सानगावकर, नंदिता उर्फ धनश्री काडगांवकर, बरकत उर्फ अमोल नाईक या सगळ्या कलाकारांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातं आहे. 

तुझ्यात जीव रंगला ही मालिका ज्यावेळी प्रसारित होते त्याचवेळी एक नवी मालिका सुरु होत असल्याच्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला मालिका बंद होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं अद्याप अधिकृतरित्या वाहिनीनं जाहीर केलेलं नाही. मात्र या वेळेत म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजता लग्नाची वाईफ वेडिंगची बायकु ही मालिका लवकरच प्रसारीत होणार आहे. झी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ही नवीन मालिका २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचंही त्यामध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला ही मालिका लवकरच निरोप घेणार की काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.  

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेबद्दल सांगायचं तर मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत सध्या पाठकबाई आणि निवडक लोकांना राजा राजगोंडा हाच राणादा असल्याचं समजलं आहे. मात्र वहिनीसाहेबांना धडा शिकवायचा असल्याच्या कारणाने अद्याप हे सगळ्यांना सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे बहुतेक मालिकेत राजगोंडा हाच राणादा असल्याचं समजल्यावर ही मालिका बहुतेक प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता असेल. 

टॅग्स :झी मराठीतुझ्यात जीव रंगला