Join us  

सोलापुरातील दिग्दर्शकाच्या ‘पोटरा’ची फ्रान्स येथील ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 4:14 AM

‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ यांचीही निवड

शीतलकुमार कांबळे

सोलापूर :  शिरापूरसारख्या (ता. मोहोळ) ग्रामीण भागातील युवा दिग्दर्शक शंकर धोत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पोटरा’ या चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली. 

दरवर्षीप्रमाणे कान्स (फ्रान्स) येथे १७ ते २८ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. यात पोटरा चित्रपट दाखविला जाणार आहे. ‘पोटरा’ हा ग्रामीण भारतातील मुलींच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सामाजिक प्रथा परंपरावर प्रकाश टाकणारा आहे. गीता एक किशोरवयीन मुलगी आहे, जी अभ्यासात व इतर उपक्रमात पुढे असते. गीताला मासिक पाळी येताच आजी तिच्या लग्नासाठी वडिलांना वर शोधण्यासाठी सांगते. पोटराची कथा एका मार्मिक मुद्यावर येऊन संपते. यात काम करणारी छकुली एका छाेट्या गावात खाेपट्यात राहणारी आहे. 

‘पोटरा’ म्हणजे काय? ‘पोटरा’ चा अर्थ ‘कच्ची ज्वारी’ असा होतो. आपल्या कथेद्वारे लेखक/ दिग्दर्शकाने एक साधर्म्य रेखाटले आहे. चित्रपटात वापरलेली लोकगीते मुलीच्या गर्भापासून ते किशोरावस्थेपर्यंतचा प्रवास सुंदरपणे अधोरेखित करतात.

‘ती’ आष्टीची रहिवासी‘पोटरा’ या चित्रपटात गीता ही मुख्य भूमिका छकुली प्रल्हाद देवकर हिने साकारली आहे. छकुली देवकर आष्टी येथील रहिवासी आहे. तिचा हा पहिला चित्रपट असून २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात गीताच्या वडिलांची भूमिका सुहास मुंडे तर गीताच्या आजीची भूमिका नंदा काटे यांनी साकारली आहे.

१७ ते २८ मे दरम्यान हाेणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. कान्स (फ्रान्स) येथे १७ मे ते २८ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. समितीने ३२ चित्रपटांच्या परिक्षणानंतर ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ व ‘तिचं शहर होणं’ या चित्रपटांची शिफारस मान्य केली.

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलसोलापूर