Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी होणार सुपरस्टार' शो उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी सुपर जजच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:56 IST

Mi Honar Superstar : ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ (Mi Honar Superstar) जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महाराष्ट्रातले ४ ते १४ वयोगटातील एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवणार आहेत. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट आणि ट्रायो असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पडणार आहे अभिनेता अंकुश चौधरी. तर समृद्धी केळकर आणि चिमुकली साईशा साळवी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मराठी सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त नृत्यदिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली बच्चेकंपनी आपल्या टॅलेण्टने मंचावर आग लावणार आहे. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, ‘मला सूत्रसंचलनाची आवड होती. मात्र संधी मिळाली नव्हती. जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. मला हा नवा प्रयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हे पर्व ज्युनियर्सचं अर्थातच ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांचं आहे. त्यामुळे या बच्चेकंपनीला सांभाळत मला सूत्रसंचालन करायचं आहे. माझ्या करिअरची सुरुवात अश्याच एका डान्स रिऍलिटी शो ने झाली होती. रिऍलिटी शोमधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. नृत्यावरचं माझं प्रेम सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा मंच खूपच खास आहे.’ मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

 

टॅग्स :अंकुश चौधरीस्टार प्रवाह