Join us  

Pallavi Joshi : नाव ओळखा पाहू..., ‘द काश्मीर फाइल्स’नंतर विवेक अग्निहोत्रींचा नवा सिनेमा, पल्लवी जोशीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 11:07 AM

Vivek Ranjan Agnihotri, Pallavi Joshi : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ‘दिल्ली फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तत्पूर्वी विवेक अग्निहोत्रींच्या एका नव्या सिनेमाचं काम सुरू झालं आहे...

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी दिग्दर्शित केलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा तुफान गाजला.  ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ‘दिल्ली फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण अद्यापही या चित्रपटावर संशोधन सुरू आहे. रिसर्च वर्क पूर्ण झाल्यानंतरच ‘दिल्ली फाईल्स’चं काम सुरू होणार. पण तत्पूर्वी विवेक अग्निहोत्रींच्या अन्य एका नव्या सिनेमाचं काम सुरू झालं आहे. इतकंच नाही तर येत्या 10 डिसेंबरपासून या चित्रपटाचं शूटींग सुरू होणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून कोविडच्या काळात Covaxin ही लस कशी तयार करण्यात आली त्याची संपूर्ण कथा अग्निहोत्री या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.

या चित्रपटाबद्दल विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी व अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिलं आहे. होय, पल्लवी जोशी यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाचं नाव ओळखायला सांगितलं आहे. 

‘ द... वॉर’ असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबत रिकामी जागा भरा, असं पल्लवी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच, चित्रपटाचं नाव प्रेक्षकांना ओळखायचं आहे. पल्लवी यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

अलीकडे ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या या आगामी सिनेमाबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, ‘मी आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल यांचं Balram Bhargava’s Going Viral – Making of Covaxin: The Inside Story हे पुस्तक वाचलं. कोरोना महामारीदरम्यान लोकांनी, महिलांनी दिवसरात्र न थकता एवढ्या लसी तयार केल्या. 250 कोटी लोकांना त्या देण्यात आल्या. सामान्य लोकांना ही गोष्ट माहित नाहीये. माझ्या चित्रपटातून मी ही गोष्ट लोकांना सांगणार आहे.’

या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलही त्यांनी खुलासा केला होता. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, निवेदिता भट्टाचार्य हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. उर्वरित 90 टक्के कलाकार हे स्थानिक कलाकार असणार आहेत. लखनौमध्ये या चित्रपटाचं शूटींग होणार आहे.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीपल्लवी जोशीद काश्मीर फाइल्सबॉलिवूड