Join us

"दुनियादारीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तिथेच...", अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:28 IST

Ankush Chaudhary : अभिनेता अंकुश चौधरीच्या लेटेस्ट पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी रंगभूमी ते रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटविणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी (Ankush Chaudhary). आजवर त्याने 'दुनियादारी', 'दगडी चाळ', 'महाराष्ट्र शाहीर', 'गुरु', 'क्लासमेट्स' अशा असंख्य लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनतीच्या जोरावर अंकुशने सिनेइंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या अभिनेत्याच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

अंकुश चौधरीने इंस्टाग्रामवर एका ग्रुपसोबतचा सेल्फी फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, जिथून माझ्या आयुष्यातील दुनियादारीची खऱ्या अर्थाने सुरवात झाली आज तिथेच गेलो होतो. माझं एमडी कॉलेज. हल्ली एरियामध्ये जीव जास्त रमायला लागला आहे. गिरणगावातली ही नवीन मुलं जोरदार काम करते आहे. एमडी कॉलेजचा हा पोरगा हे करतो आहे, तिकडे ते करतो आहे त्याचं हे चालू आहे हे सतत कुठेना कुठे काम करत असताना कानावर ऐकू येत राहतं आणि दिल खुश होऊन जातो. कधी कोणे एके काळी एक ठिणगी टाकली असेल आणि आज बघता बघता त्याचा कधीही न विझणारा असा ज्वालामुखी तयार झाला आहे. विचारांच्या साथीने बहारदार सादरीकरणा सकट नव्या युगाच्या नव्या मनोरंजनाची मशाल ही मंडळी घेऊन पुढे निघाली आहेत. म्हणून हल्ली माझ्या अस्सल दुनियेशी स्वतःला जोडून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करतो आहे नवीन मित्र बनवतो आहे. ते जुने नाके आणि त्याच नाक्यावरची ही नवी पोरं मला ‘नवं’ असं काहीतरी शिकायला मदत करते आहे. मागून येणारी पिढी जबरदस्त आणि जोरदार पद्धत्तीने काही सांगू बघते आहे.

त्याने पुढे लिहिले की, ‘ब्रम्हपुरा’ हे नाटक तालीम स्वरूपात आज संध्याकाळी पाहिलं आणि आतून हलून गेलो. दोन हॅलोजनच्या प्रकाशत सर्व मंडळी नाटक सादर करत होती पण मी एकांकिकेत दाखवल्या गेलेल्या ब्रह्मपुरा गावी कधी पोहचलो माझं मलाच कळलं नाही. स्पर्धेच्या गदारोळात नुसती झाक झुक न करता समाजभान जागरूक ठेवून ही माझ्या कॉलेजची मंडळी नाटक करतात ह्याचा आनंद वाटला. पोरांनो सवाईच्या अंतिम फेरीत जोरदार प्रयोग करा. आम्ही सगळे ताकदीनिशी तुमच्या मागे उभे आहोत. MD चे आले आले आले. (सवाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या सर्व एकांकिकांना माझ्या मनापासून शुभेच्छा!)

टॅग्स :अंकुश चौधरी