Join us

'ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री म्हणाली, "वात्सल्य आश्रम कोर्ट केसनंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:16 IST

सध्या 'ठरलं तर मग' मालिका रंजक वळणावर आली.

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग ' ही मालिका सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षात या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांना या मालिकेत कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जुलै महिन्यात जाहीर केला जाणार आहे. या वात्सल्य आश्रम कोर्ट केसनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. आता मालिकेत भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने स्वतःच मालिका बंद होणार की नाही, याबाबत खुलासा केलाय. 

'ठरलं तर मग'मध्ये अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेने या चर्चांवर पूर्णविराम देत स्पष्ट खुलासा केला आहे. मोनिका दबडेने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती म्हणते, "वात्सल्य आश्रम आणि विलास खून खटला याचा निकाल लागणार आहे. पण, मालिका बंद होणार नाहीये. मालिकेत अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे मालिका पाहात राहा", असं तिनं म्हटलं. 

'ठरलं तर मग'मालिका संपत नसल्याने सध्या चाहत्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार? केस कोण जिंकणार? साक्षी, प्रिया आणि महिपतला शिक्षा होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 'ठरलं तर मग' ही मालिका, स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात 'महाराष्ट्राची महामालिका' ठरली आहे. या मालिकेत जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली असून अमित भानुशालीने अर्जुनची मुख्य भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीस्टार प्रवाहजुई गडकरी