Join us  

जुई गडकरीच्या घरात आहेत हे खास पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 7:15 AM

जुईच्या घरी एकूण आठ पाळीव प्राणी आहेत. त्यात चार पर्शियन मांजरी आणि एक हिमालयन मांजर अशा पाच मांजरी आहेत. या मांजरीची त्यांनी नावे देखील ठेवली आहेत.

ठळक मुद्देजुई अगदी लहान असताना तिला मांजरींचा लळा लागला. हे प्राणीप्रेम कायम वाढतच गेलं. त्यामुळेच आज तिच्याकडील सगळ्या पाळीव प्राण्यांची ती आई झालेली आहे. प्राणीप्रेमाचा हा वारसा तिला तिच्या पालकांकडून मिळाला आहे.

'झी युवा' ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येत असते. २०१८ या वर्षात सुरू झालेली 'वर्तुळ' ही मालिका देखील यापैकीच एक आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारीअभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तिच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची इच्छा तिच्या फॅन्सना नेहमीच लागलेली असते. याच जुईच्या आयुष्यातील एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जुईच्या घरी एकूण आठ पाळीव प्राणी आहेत. त्यात चार पर्शियन मांजरी आणि एक हिमालयन मांजर अशा पाच मांजरी आहेत. या मांजरीची त्यांनी नावे देखील ठेवली आहेत. छकुली, बंडू, बच्चू, चिंगू, मुन्ना अशी या मांजरीची नावे आहेत. जुईचा मांजरींवर जास्त जीव असला, तरीही तिचं श्वानप्रेमदेखील कमी नाही. या मांजरीच्या सोबतीला बाबा, माऊ आणि बुट्टू हे तीन कुत्रे सुद्धा आहेत.

कामाचा दिवसभराचा ताण हलका व्हावा, यासाठी जुई तिच्या या मुलांसोबत वेळ घालवणे पसंत करते असे ती सांगते. ती आपल्या या पाळलेल्या प्राण्यांना पोटच्या मुलांसारखं मानते, म्हणूनच त्यांची नावं सुद्धा तिने लहान मुलांच्या टोपण नावांसारखी ठेवली आहेत. दिवसभराचा सारा थकवा त्यांच्या सोबतीमुळे पळून जातो असे ती आवर्जून सांगते.

जुई अगदी लहान असताना तिला मांजरींचा लळा लागला. हे प्राणीप्रेम कायम वाढतच गेलं. त्यामुळेच आज तिच्याकडील सगळ्या पाळीव प्राण्यांची ती आई झालेली आहे. प्राणीप्रेमाचा हा वारसा तिला तिच्या पालकांकडून मिळाला आहे. घरातील सगळ्यांनाच प्राण्यांविषयी आपुलकी आणि प्रेम असल्याने जुई शूटसाठी घराबाहेर गेली असतानाही या प्राण्यांची छान काळजी तिच्या कुटुंबियातील मंडळी घेतात. हे पाळीव प्राणी एकत्र खेळतात, मस्ती करतात, कधी एकमेकांसोबत भांडतात. त्यांच्यातील हे बंध अगदी 'टॉम अँड जेरी'सारखे आहे. जुईसाठी ही सारीच मंडळी फार प्रिय आहेत. 

तिच्या या पाळीव प्राण्यांविषयी बोलताना जुई सांगते, "हे आठही जण माझ्यासाठी माझ्या मुलांसारखे आहेत. शूटिंगहून परत येत असताना मुले माझी घरी वाट बघत आहेत, असं मला वाटत असतं. माझ्या आईबाबांप्रमाणेच मलाही प्राणी खूप आवडतात. त्यांच्यातील जिव्हाळा अगदी 'टॉम अँड जेरी'सारखाच आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने दिवसभराचा क्षीण निघून जातो."

टॅग्स :जुई गडकरी